आरमोरीतील प्रसिद्ध दुर्गामाता देवस्थानच्या कारभारात अनियमितता?

ट्रस्टी बोरकर यांची चौकशीची मागणी

गडचिरोली : आरमोरी येथील दुर्गामाता देवस्थान जिल्ह्यातील पुरातन देवस्थानांपैकी एक आहे. येथील नवरात्र उत्सव विदर्भात प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो भाविक या दुर्गामातेच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र या देवस्थानच्या विश्वस्त मंडळाकडून घटनेनुसार कारभार सुरू नसून बरीच अनियमितता आहे. त्यामुळे याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ट्रस्टचे सदस्य शरद बोरकर, रेवतीराम मने, जितेंद्र मने यांच्यासह अमित जोशी, राकेश घाटे यांनी केली आहे. (अधिक वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा)

यासंदर्भात बोरकर यांनी पत्रपरिषद घेऊन आपले म्हणने मांडले. त्यांच्या म्हणण्यानुसार, दुर्गामाता देवस्थानात वर्ष 2015 ते आजतागायत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला कारभार स्वमर्जीने व मनमानी पद्धतीने केला आहे. मंडळाच्या सर्व सदस्यांना विश्वासात न घेता निर्णय घेण्यात येतात. त्यामुळे दुर्गा माता देवस्थान मंडळाच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी सहाय्यक धर्मदाय आयुक्त गडचिरोली यांच्याकडे केली आहे.

घटनेतील नियमानुसार प्रत्येक सभेची नोटीस सभेच्या पुर्वी तीन दिवस किंवा त्याअगोदर देणे अपेक्षित आहे. परंतु तसे न करता पदाधिकारी कधीही सभा बोलवितात. त्याची माहितीही मंडळाच्या सदस्यांना मिळत नाही. त्यामुळे मंडळाच्या निर्णयामध्ये बाकी सदस्यांना आपले मत मांडता येत नाही. देवस्थानचे सचिव गणेश वनवे हे प्रत्येक सभांना बोलावून संख्येच्या बळावर ठराव पारीत करतात. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या मृत्युनंतर नाव बदल प्रक्रिया सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्याकडे सादर केली आहे. ती कार्यवाही सहाय्यक धर्मदाय आयुक्त गडचिरोली या कार्यालयात प्रलंबित आहे.

नेमकी कुठे झाली गडबड?

सन 2015 ते 2023 पर्यंतच्या कालावधीत केलेल्या ऑडीटमध्ये अनियमितता दिसुन येते. मंदिर जिर्णोद्वाराच्या बांधकामांचा हिशेब बरोबर ठेवला नाही. घटनेतील निर्देशानुसार मंडळाचे अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष यांचे संयुक्त खाते असताना संबंधितांनी अद्यापपर्यन्त आदान-प्रदान व्यवहार केलेला दिसुन येत नाही. मंदिर बांधकाम व दरवर्षाचा नवरात्र उत्सव, दानपेटीतील महिन्याला जमा होणारी रक्कम बँकेत जमा केली जात नाही. तसेच देवस्थानच्या नावाने असलेल्या गाळे व शेतीतून मिळणाऱ्या मिळकतीचा हिशेब ठेवल्या जात नाही. सन 2010 पासून किरायेदाराला पावती दिली गेली नाही. रक्कम बँकेत जमा केली जात नाही. त्यामुळे एकंदर देवस्थानच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मनमानी कारभार चालवून अनियमितता केली असल्याने याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पत्रपरिषदेत करण्यात आली.

अध्यक्ष-सचिव काय म्हणतात?

मी दुर्गामाता देवस्थान मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी डिसेंबर 2023 पासून स्वीकारली आहे. तत्कालीन अध्यक्षांच्या परवानगीने व आदेशानुसार आम्ही सर्व सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी कामे केली. तत्कालीन अध्यक्षांनी मंदिर जिर्णोद्वाराच्या बांधकामाचे आॅडिट केले आहे. आता मी अध्यक्ष म्हणून देवस्थानची कामे नियमानुसार करीत आहे. आरोप करणाऱ्यांना सभेला बोलाविले तरी ते सभेला उपस्थित राहात नाही, असे दुर्गामाता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तुळशीराम गोंधोडे यांनी सांगितले.

ट्रस्टचे सचिव गणेश वणवे म्हणाले, कोणत्याही मंडळाच्या किंवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड सभासदांमधून बहुमताने होत असते. माझी सचिवपदी निवड झाल्यापासून मी अध्यक्षांच्या परवानगीने व आदेशानुसार देवस्थानची कामे घटनेनुसारच करीत आहे. पण पंचक्रोशीतील प्रसिद्ध असलेल्या या देवस्थानची बदनामी करण्याचा प्रयत्न शरद बोरकर, रेतीराम मने, जितेंद्र मने यांच्याकडून केला जात आहे, असे वणवे म्हणाले.