Home राजकीय घडामोडी ‘व्होट बचाव, देश बचाव’ आंदोलनाच्या नियोजनासाठी गडचिरोलीत बैठक

‘व्होट बचाव, देश बचाव’ आंदोलनाच्या नियोजनासाठी गडचिरोलीत बैठक

शेकडो काँग्रेस कार्यकर्ते दिल्लीला जाणार

मार्गदर्शन करताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, मंचावर आ.बाला बच्चन, खा.डॅा.नामदेव किरसान, आ.रामदास मसराम व इतर पदाधिकारी

गडचिरोली : देशातील लोकशाही मूल्यांचे संरक्षण, मतदारांच्या अधिकारांचे संवर्धन आणि कथित मतचोरीविरोधात आवाज उठविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘व्होट बचाव, देश बचाव’ आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाच्या नियोजनासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बैठक घेण्यात आली. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, पक्षाचे केंद्रिय प्रतिनिधी तथा मध्यप्रदेशचे माजी गृहमंत्री आ.बाला बच्चन यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत दिल्लीतील आंदोलनासाठी जाण्याचे नियोजन करण्यात आले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदारांच्या मतदानाच्या अधिकारांचे संरक्षण हे आंदोलनाचे प्रमुख मुद्दे असणार आहेत.

या बैठकीला खासदार डॅा.नामदेव किरसान, आ.रामदास मसराम, पक्षाचे प्रभारी जिल्हाध्यक्ष पंकज गुड्डेवार, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे व इतर पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी रविंद्र दरेकर, माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी सदस्य राम मेश्राम, कुसूम अलाम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

देशातील लोकशाही मूल्ये अबाधित राहावीत आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण व्हावे, मतदारांच्या अधिकारांशी कोणत्याही प्रकारे तडजोड होता कामा नये. निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांबाबत जबाबदारी निश्चित करून लोकशाही व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कायम राखण्यासाठी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना करण्यात आले.

या बैठकीत आंदोलनाची रूपरेषा, जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग, तालुकास्तरावर जनजागृती आणि दिल्लीतील आंदोलनासाठी आवश्यक नियोजन याबाबत चर्चा करण्यात आली.