Home दैनंदिन बातम्या गडचिरोलीत यंदाही दिवाळीनिमित्त आज व उद्या सुरांची सांज व पहाट

गडचिरोलीत यंदाही दिवाळीनिमित्त आज व उद्या सुरांची सांज व पहाट

अजब-गजब विचार मंचचे आयोजन

गडचिरोली : खास दिवाळी उत्सवाचे औचित्य साधून गडचिरोलीतील ‘अजब-गजब विचार मंच’च्या वतीने यंदाही ‘संगीत महोत्सव 2026 (पर्व-13)’ चे आयोजन करण्यात आले आहे. आज (दि.5) सायंकाळी आणि उद्या दि.6 ला पहाटे ही संगीत मैफिल सजणार आहे.

नामांकित कलाकारांच्या उपस्थितीत सुरांच्या या भव्य मैफिलीचे आयोजन अजब-गजब विचार मंचतर्फे करण्यात आले आहे. हे दोन्ही कार्यक्रम विद्याभारती कन्या हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात होणार आहेत. महोत्सवाचा पहिला कार्यक्रम आज गुरुवारी (दि.5) सायंकाळी 6 वाजता सुरू होईल. ‘दीपावली सांध्य मैफिल’ असे या कार्यक्रमाचे नाव असून यामध्ये ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ फेम प्रसिद्ध कलाकार हर्षद गोलेसर आणि दुहिता गोलेसर आपल्या गायनाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील. सोबतच ‘सूर नवा ध्यास नवा’ची विजेती प्रख्यात गायिका सन्मिता धापटे-शिंदे हिच्या सुरेल आवाजाची जादू अनुभवण्याची संधी गडचिरोलीकरांना मिळणार आहे.

महोत्सवाचा दुसरा दिवस भक्तीमय आणि शास्त्रीय संगीताने उजाडणार आहे. शुक्रवारी (दि.6) पहाटे 5.30 वाजता ‘पहाट स्वरांच्या दिव्यांची’ हा बहारदार कार्यक्रम होणार आहे. यामध्ये भक्ती संगीत, अभंग आणि नाट्यगीतांची सुंदर मेजवानी असेल. या मैफिलीत सुप्रसिद्ध गायक राजयोग धुरी आणि गायिका सन्मिता धापटे-शिंदे आपले सादरीकरण करतील. या मंगलमयी पहाट कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर गलांडे आणि आसावरी गलांडे-देशपांडे करणार आहेत.

या दोन्ही संगीत मैफलींचा गडचिरोलीकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन अजब-गजब विचार मंचाचे सतीश त्रिनगरीवार, आशुतोष कोरडे, सचिन मून, चेतन गोरे, दत्तू सूत्रपवार, सुभाष धंदरे, सतीश विधाते, प्रवीण खडसे, विश्राम होकम, अरविंद कात्रटवार, पुरुषोत्त्म ठाकरे, प्रतीक बारशिंगे, मिलिंद उमरे, नंदकिशोर काथवटे आदींनी केले आहे.