संताजी मंडळातर्फे गुणवंतांसह ज्येष्ठ नागरिकांचा केला सत्कार

प्रमोद तरारे यांच्याहस्ते उद्घाटन

गडचिरोली : संताजी मंडळातर्फे दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसह, ज्येष्ठ नागरिकांच्या सत्काराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरण (मुंबई)चे अध्यक्ष तथा माजी धर्मदाय आयुक्त प्रमोद तरारे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संताजी सोशल मंडळाचे अध्यक्ष प्रा.देवानंद कामडी होते. (सविस्तर बातमी खाली वाचा)

कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.रामचंद्र वासेकर, किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्था आरमोरीचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे, नरेंद्र तरारे, संताजी मंडळाचे सचिव विठ्ठलराव कोठारे, संताजी समिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर वासेकर, प्रांतिक तैलीक महासंघाचे अध्यक्ष प्रमोद पिपरे, विदर्भ तेली महासंघाचे अध्यक्ष सुरेश भांडेकर, गोपीनाथ चांदेवार, भास्करराव ठाकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

सर्वप्रथम संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली .स्वर्गीय श्रावणी तरारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बीपीएल मधील तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी 21 हजार रुपये पारितोषिक देण्यात आले. तसेच भास्करराव ठाकरे, सुरेश भांडेकर यांच्यातर्फे 6 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1100 रुपये रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. दहावी व बारावी, नवोदय तथा स्कॉलरशिप व एमबीबीएसच्या गुणवत्ताप्राप्त 65 विद्यार्थ्यांना शिल्ड, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच 5 ज्येष्ठ नागरिकांचाही शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शक डॅा.रामचंद्र वासेकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी ध्येय समोर ठेवून आणि आपली आवड लक्षात घेऊन करिअर करावे. उच्चशिक्षित होऊन नोकरी करीत असतानाच समाजाची सुद्धा सेवा करावी. विद्यार्थ्यांनी अनेक चांगल्या व्यक्तींची प्रेरणा घेऊन उच्चशिक्षित व्हावे.

प्रास्ताविक प्रा.देवानंद कामडी यांनी, तर सूत्रसंचालन विठ्ठलराव कोठारे व आभार सुधाकर लाकडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संताजी मंडळाचे सदस्य तसेच संताजी महिला मंडळाच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.