पत्नीची हत्या, पतीची आत्महत्या, चार निरागस मुले उघड्यावर

रुपीनगट्टातील हादरवणारी घटना

या निरागस मुलांचा सांभाळ कोण करणार, असा प्रश्न आता शिल्लक आहे.
हत्या आणि आत्महत्येचे बळी ठरलेले हेच ते दाम्पत्य

धानोरा : चारित्र्यावरील संशय आणि त्यातून निर्माण झालेला कलह विकोपाला जाऊन पतीने चक्क पत्नीला जीवानिशी संपवून स्वत: आत्महत्या केली. ही थरारक घटना धानोरा तालुक्याच्या रुपीनगट्टा या छत्तीसगड सीमेकडील गावात घडली. यामुळे त्या दाम्पत्याची चार चिमुकली मुले आणि वृद्ध वडीलांना निराधार होऊन उघड्यावर यावे लागले.

या घटनेत राकेश सुकना कुजूर (37 वर्ष) याने पत्नी कनिष्ठा (32 वर्ष) हिचे दगडावर डोके आपटून तिची हत्या केली. पोलीस मदत केंद्र पेंढरीअंतर्गत रुपीनगट्टा या गावातील राकेश याच्या शेतातील धानाची मळणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पती-पत्नी शेतावर गेले होते. यादरम्यान राकेशचे वडील व मुलगी शेतातच होते. दुपारी या दाम्पत्याने घराकडे जात असल्याचे सांगितले, मात्र सायंकाळी वडील व मुलगी घरी परतले असता मुलगा व सून दिसले नाही.

याची माहिती नातेवाईकांना आणि ग्रामस्थांना देत दोघांचाही शोध घेण्यात आला. दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास गावापासून काही अंतरावर गागीरमेटा डोंगर परिसरात कनिष्ठाचा रक्ताने माखलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. घटनास्थळावर मोठ्या दगडावर रक्तस्त्राव दिसून आल्याने दगडावर डोके ठेचून हत्या केल्याचे स्पष्ट झाले. मात्र राकेश आढळून न आल्याने हत्येनंतर तो पसार झाल्याचे समजून त्याचाही शोध ग्रामस्थांच्या मदतीने सुरू करण्यात आला.

दरम्यान दुसऱ्या दिवशी राकेशच्या शेतातच त्याचा मृतदेह आढळून आला. त्याने पत्नीची हत्या केल्यानंतर स्वतःही विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती प्राप्त होतात पेंढरीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्या्ंसह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

या दाम्पत्याला मानवी (12 वर्ष), मेहमा, शालिनी या तीन मुली आणि अर्णव हा एक मुलगा आहे. आई-वडील दोघांचाही मृत्यू झाल्याने चारही छोट्या मुलांसह त्यांचे वृद्ध आजोबा निराधार आणि पोरके झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.