
गडचिरोली : राज्यातील महायुतीचे सरकार सर्वांच्या कल्याणासाठी काम करत आहे. बीएलओमार्फत एसआयआरचे सर्वेक्षण सुरू आहे. यामध्ये कोणत्याही नागरिकाचे नाव सुटू नये, ही कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. कार्यकर्त्यांच्या भरवशावरच आपण विधानसभेत विजय मिळविला आहे. आगामी काळात जिल्ह्यात विधानसभेच्या जागा वाढणार आहेत. त्यामुळे निवडणुकांवर लक्ष केंद्रित करून पक्ष संघटनेसाठी कार्यकर्त्यांनी तत्परतेने कामाला लागावे, असे आवाहन माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा, तसेच रवींद्र वासेकर यांचा जिल्हाध्यक्षपदाचा दशकपूर्ती सोहळा येथील अभिनव लॉनमध्ये झाला, यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. या मेळाव्यात सत्कारमूर्ती म्हणून जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, डॉ.रामकृष्ण मडावी, प्रा.ऋषीकांत पापडकर, जेसा मोटवानी, जगदीश रालाबंडीवार, जि.प.चे माजी अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तथा राकाँच्या महिला जिल्हाध्यक्ष तनुश्री आत्राम, अहेरी पं.स.चे माजी सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, न.प.चे पाणी पुरवठा सभापती लीलाधर भरडकर आणि सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आ.डॉ.धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, राजकारणात उतार-चढाव येत असतात. राज्यातील महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून बोगस आदिवासींचा प्रश्न विधिमंडळात मांडला. यावर मुख्यमंत्र्यांनी उपाययोजना आखून दिलासा दिला आहे. तसेच जिल्ह्यातील वनहक्काचा प्रश्नही निकाली निघाल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यात उद्योगक्रांतीचे वारे वाहत आहेत. एसआयआर प्रक्रियेला सहकार्य करून पुढील काळातहोणाऱ्या निवडणुकांमध्ये विजय मिळविण्यासाठी बुथस्तरावर नियोजनात्मक पद्धतीने रचना करावी, असे आवाहन त्यांनी केले.
आगामी काळात गडचिरोलीत विधानसभेच्या जागा वाढणार आहेत. लोकसभेलाही जिल्ह्याला स्वतंत्र जागा मिळू शकते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जागरूक राहून जनतेची कामे करावी. राजकीय जीवनात केवळ स्वतःच्या हिताचा विचार करून चालत नाही तर, लोकांमध्ये फिरावे लागते, काम करावे लागते, असा सल्लाही त्यांनी दिला.
जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांचा गौरव
आ.डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या कार्याचा गौरव केला. वासेकर यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये सलग पाच वर्षे जिल्हाध्यक्षपद सांभाळले. यानंतर त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविली. त्यांच्या नेतृत्वात आपण तीनदा विजय मिळविला आहे. यापुढेही त्यांच्या नेतृत्वातच विजय मिळवायचा आहे. रवींद्र वासेकर हे सर्वांना सांभाळून घेणारे नेतृत्व असल्याचे गौरवोद्गार त्यांनी व्यक्त केले.
जिल्हाभरातून कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली, सिरोंचासह विविध तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी धर्मरावबाबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षात प्रवेश केला. नवप्रवेशित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे आ.डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व पक्षाचा दुपट्टा देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, जि.प.चे माजी अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, माजी आ.डॉ. रामकृष्ण मडावी, नंदू नरोटे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन न.प.चे सभापती लिलाधर भरडकर यांनी केले. मेळाव्याला जिल्हाभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































