यावर्षी 15 दिवस रात्री 12 पर्यंत मिळणार भोंगे वाजविण्याची सूट

विविध सण-उत्सवांसाठी परवानगी

गडचिरोली : केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, 2017 च्या नियम 5 उपनियम (3) अन्वये राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना वर्षातून 15 दिवस ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सशर्त सुट जाहीर करण्याचे अधिकार प्रदान केले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्याशी सल्लामसलत करून सन 2026 या वर्षाकरिता ठराविक 15 दिवस सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरण्यास परवानगी जाहीर केली आहे.

रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीवर्धक वापरण्यास निश्चित करण्यात आलेल्या यावर्षीच्या दिवसांमध्ये शिवजयंती (19 फेब्रुवारी 2026), डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती (14 एप्रिल), ईद-ए-मिलाद (26 ऑगस्ट), गणेश उत्सवासाठी चार दिवस (20, 23, 24 व 25 सप्टेंबर), नवरात्र उत्सवासाठी चार दिवस (19, 20, 21 व 22 ऑक्टोबर 2026), दिवाळी लक्ष्मीपूजन (8 नोव्हेंबर), ख्रिसमस (25 डिसेंबर) तसेच 31 डिसेंबर 2026 अशा एकूण 15 दिवसांचा समावेश आहे.

ही सुट श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे व मेजवानी कक्ष यांसारख्या बंद जागांव्यतिरिक्त इतर ठिकाणी लागू राहील. मात्र, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 तसेच सुधारित नियम 2017 मधील तरतुदींचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील. जनहित याचिका क्र. 173/2010 मध्ये उच्च न्यायालयाने 16 ऑगस्ट 2016 रोजी दिलेल्या आदेशांचे पालन करणे आवश्यक राहील.

जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार निश्चित ध्वनीमर्यादा व अटींचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता संबंधित आयोजक व विभागांना घ्यावी लागणार आहे. राज्य शासनाने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रात ही सवलत लागू राहणार नाही, असेही जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.