Home पब्लिक प्रॉब्लेम राखी–गुरवळ्यातील शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्‍यांच्या ओएसडींचा संवाद

राखी–गुरवळ्यातील शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्‍यांच्या ओएसडींचा संवाद

चर्चा निष्फळ, तूर्त उपोषण कायम

गडचिरोली : प्रस्तावित विमानतळासाठीची भूसंपादन कार्यवाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सध्या स्थगित ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बेमुदत साखळी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अनिरुद्ध पालकर यांनी केले. मात्र शेतकरी अद्याप उपोषणावर ठाम असून गुरूवारीही त्यांचे साखळी उपोषण सुरूच होते.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार पालकर यांनी बुधवारी राखी– गुरवळा येथील उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलक शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनासंबंधीचा 12 मे 2026 रोजीचा शासन निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी गुरवळा–राखी–हिरापूर– शिरपूर शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने 2 ऑक्टोबर 2026 पासून राखी–गुरवळा येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे.

या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून, भूसंपादनाची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरही मुख्यमंत्र्‍यांच्या सूचनेनुसार भूसंपादन कार्यवाही थांबवण्यात आली आहे, असे पालकर यांनी ग्रामस्थांना सांगितले. बळजबरीने जमीन घेऊन प्रकल्प राबवण्याचा मुख्यमंत्र्यांचा उद्देश नसल्याचे पालकर यांनी स्पष्ट केले. चर्चेतून इतर मार्ग निघू शकतो आणि न पटल्यास पुन्हा आंदोलन करण्याच्या शेतकऱ्यांचा हक्क अबाधित असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र बहुतांश शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

विमानतळासाठी जमीन देण्यास विरोध

राखी, गुरवळा, हिरापूर आणि शिरपूर परिसरातील जमीन सुपीक व बारमाही बागायती आहे. परिसरातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असून, शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यामुळे विमानतळासाठी जमीन देण्यास आपला विरोध दर्शविण्यासाठी साखळी उपोषण करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

यावेळी तहसीलदार सागर कांबळे, पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.