माओवाद्यांच्या अस्तित्वाच्या खुणा पुसण्यासाठी सरसावले पोलीस

एकाच दिवशी 44 स्मारके नष्ट

गडचिरोली : गेल्या साडेचार दशकांपासून गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलांसह काही अतिसंवेदनशिल गावांमध्ये आपले अस्तित्व निर्माण करणाऱ्या माओवाद्यांची दहशत जवळजवळ संपवल्यानंतर आता त्यांच्या अस्तित्वाच्या खुणाही मिटवण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. विविध भागात असलेली तब्बल 44 नक्षल स्मारके पोलिसांनी मोठा फौजफाटा आणि जेसीबीच्या सहाय्याने एका दिवसात उद्ध्वस्त केली. एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात नक्षल स्मारके नष्ट करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पोलिसांचे सी-60 पथक, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान आणि जिल्हा पोलीस दलाचे मिळून 18 पथकातील सुमारे 800 जवानांनी विशेष अभियान राबवून ही कारवाई केली. आता माओवाद्यांच्या दहशतीत न राहता खऱ्या अर्थाने तुम्ही स्वतंत्र झाला आहात, असा संदेशच या कारवाईतून पोलिसांनी त्या भागातील नागरिकांना दिला आहे.

स्थानिक नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी आणि आपले अस्तित्व दाखविण्यासाठी माओवाद्यांकडून अतिदुर्गम भागांमध्ये आपल्या मृत सहकाऱ्यांच्या स्मरणार्थ या स्मारकांची निर्मिती केली जात होती. अलिकडच्या काळात गडचिरोली पोलीस दलाकडून राबविल्या जाणा­ऱ्या प्रभावी माओवादविरोधी अभियानांमुळे जिल्ह्रातील माओवादी चळवळ जवळजवळ संपुष्टात आली आहे. सामान्य नागरीकांच्या मनात माओवाद्यांची असलेली भितीही आता कमी होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाकडून माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक असलेले जिल्हाभरातील 44 स्मारके 18 फेब्रुवारी रोजी नष्ट करण्यात आली आहेत.

16 बॅाम्ब शोधक-नाशक पथक, विशेष अभियान पथक, सीआरपीएफ व विविध पोस्टे/ उपपोस्टे/ पोमकें येथील मिळून एकूण 18 पथकांमधील जवानांनी जिल्ह्रातील विविध जंगल परिसरात शोध अभियान सुरु केले. यादरम्यान एकूण 15 पोस्टे / उपपोस्टे/ पोमकें हद्दीतील एकूण 44 स्मारके आढळून आली. सदर स्मारकांची व परिसराची बिडीडीएस पथकाने कसून तपासणी केली व त्यानंतर जवानांनी सदर स्मारके उद्ध्वस्त केली. यामध्ये एटापल्ली उपविभागातील 18, हेडरी उपविभागातील 17, भामरागड उपविभागातील 5, जिमलगट्टा उपविभागातील 2, धानोरा उपविभागातील 1 आणि पेंढरी उपविभागातील 1 स्मारकाचा समावेश आहे. माओवाद्यांचे आश्रयस्थान समजल्या जाणा­ऱ्या अतिदुर्गम पेनगुंडा, कवंडे, तुमरकोठी, गर्देवाडा, वांगेतुरी व गट्टा (जां.) इत्यादी गावांतील माओवाद्यांची स्मारके उध्वस्त करून गडचिरोली पोलीस दलाने परिसरातील नागरिकांमध्ये माओवाद्यांची असलेली दहशत संपवलेली आहे.

ही केवळ भौतिक स्मारके नसून माओवाद्यांच्या हिंसाचार आणि दहशतीची निशानी होते. मात्र गडचिरोली पोलीस दलाने ही स्मारके नष्ट केल्याने ग्रामस्थांमध्ये सुरक्षेचे वातावरण निर्माण होऊन पोलीस दलाप्रती व प्रशासनाप्रती विश्वास वृद्धींगत झाला आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. व पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.

“गडचिरोली जिल्ह्रातील माओवादी चळवळ जवळपास संपुष्टात आली असून, जिल्ह्रातील नागरिकांसाठी सुरक्षेचे वातावरण निर्माण करण्यासाठी गडचिरोली पोलीस दल नेहमीच प्रयत्नशिल आहे. पोलीस दल खंबीरपणे जिल्ह्रातील नागरिकांच्या पाठीशी उभे आहे. कोणीही माओवाद्यांच्या भुलथापांना बळी पडू नये,” असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.