गडचिरोली : जिल्ह्यातील माओवाद संपुष्टात आला असला तरी त्यांच्या पाऊलखुणा अजूनही कायम आहेत. माओवाद्यांकडून सुरक्षा दलांना धोका पोहचविण्यासाठी, तसेच घातपाताच्या कारवाया करण्यासाठी शस्रांच्या निर्मितीत वापरल्या जाणारे साहित्य पोलिसांच्या हाती लागले. छत्तीसगडकडील सीमावर्ती भागातील बालबेडाच्या जंगलात हे साहित्य जमिनीखाली पुरलेले होते. बॅाम्ब शोधक आणि नाशक पथकाच्या मदतीने हे साहित्य हस्तगत करून नष्ट करण्यात आले.
या शस्रास्र कारखान्याची गोपनिय माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती. यापूर्वी 23 व 27 मे 2026 रोजी केलेल्या कारवाईतही अशाच पद्धतीने जंगलातील शस्र निर्मिती कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा दि.27 जून रोजी जमिनीत लपवून ठेवलेले साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस व सीआरपीएफच्या जवानांना यश आले.
पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोली आणि प्राणहिता यांच्या संयुक्त 6 तुकड्या, बिडीडीएसचे 1 पथक व सीआरपीएफच्या पथकाने हे शोध अभियान राबविले. बालबेडाच्या जंगल परिसरात विशेष अभियान पथकांकडून घेरा घालुन बिडीडीएसच्या जवानांनी परिसराची कसून तपासणी केली असता, 5 ते 6 टन वजन असलेली 1 लेथ मशीन, 150 नग क्लेमोर व बिजीएल पाईप्स, 220 नग 12 बोअर पाईप, 20 नग रायफल रॉड, मेटल पट्टी इ. माओवादी साहित्य हस्तगत करण्यात आले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळावरुन मिळालेले सर्व माओवादी साहित्य पथकातील जवानांच्या सहाय्याने जागीच नष्ट करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या देखरेखीखाली विशेष अभियान पथक गडचिरोली व प्राणहिता, इंटेलिजन्स सेल, तसेच बीडीडीएस पथकातील जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली.
































