गडचिरोली : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या स्वाक्षरीचा गैरवापर करून खनिज निधी (DMF) संदर्भातील बनावट प्रशासकीय मंजुरी आदेश काढल्याचे प्रकरण समोर येऊन आठवडा पूर्ण होत असताना अद्यापही त्या आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलेले नाही. या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खनिज उत्खनन सुरू आहे. त्यातून जिल्हा खनिज प्रतिष्ठान (DMF) मध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी जमा होत आहे. हा निधी आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा व नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी वापरणे अपेक्षित आहे. मात्र काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाने बनावट प्रशासकीय मंजुरी आदेश तयार करून जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीचा गैरवापर करण्यात आल्याचे गंभीर प्रकरण उघड झाले. जिल्ह्यातील सर्वोच्च प्रशासकीय कार्यालयाशी संबंधित अशा प्रकारची घटना घडणे ही अत्यंत चिंताजनक बाब असून प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, असे ब्राह्मणवाडे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर करून शासकीय प्रक्रियेची दिशाभूल होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास कमी होऊ शकतो. राज्याचे मुख्यमंत्री तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात अशा घटना घडणे ही जिल्ह्याच्या प्रतिमेला धक्का देणारी बाब असल्याचे ब्राह्मणवाडे यांनी म्हटले आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या व शासनाची फसवणूक करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच या प्रकरणात कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा सहभाग अथवा निष्काळजीपणा आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करावी. यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना आवश्यकता सूचना व निर्देश देण्यात यावे, अशी मागणी महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी विभागीय आयुक्तांकडे निवेदन देऊन केली आहे.
































