चामोर्शीतील कॅापी प्रकरणात तीन शिक्षकांसह शिपाई निलंबित

चॅट जीपीटीवरून शोधली उत्तरे

चामोर्शी : बारावीच्या राज्यशास्राच्या पेपरदरम्यान प्रश्नपत्रिकेचा फोटो बाहेर पाठवून आणि उत्तरे चॅट जीपीटीवरून शोधून त्या उत्तरांची प्रिंट कॅापी परीक्षा केंद्रावर आणण्याचा प्रकार येथील जा.कृ.बोमनवार कनिष्ठ विज्ञान व कला महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर घडला. सामुहिक कॅापीचा प्रयत्न करण्याचा हा प्रकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या केंद्र भेटीदरम्यान उघडकीस आणला. याप्रकरणी केंद्र प्रमुख आणि इतर दोन शिक्षकांसह शाळेच्या शिपायाला निलंबित करण्याचा आदेश देण्यात आला. एवढेच नाही तर त्या चारही जणांवर चामोर्शी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, चामोर्शीतील जा.कृ बामनवार माध्यमिक वि‌द्यालय तथा कनिष्ठ विज्ञान व कला महावि‌द्यालय या बारावीच्या परीक्षा केंद्रावर दि.18 फेब्रुवारी रोजी राज्यशास्र विषयाचा पेपर सुरू असताना सीईओ सुहास गाडे यांच्या भरारी पथकाने भेट दिली. यावेळी परीक्षा केंद्राबाहेर चालू विषयाच्या मायक्रोनोट्स, तसेच राज्यशास्त्र विषयाच्या चालू असलेल्या पेपरचे प्रश्न चॅट जीपीटीवरुन प्रिंट आऊट काढलेले मिळून आले. सीईओ गाडे यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी याचा जाब विचारत चौकशी समिती गठीत केली. परीक्षा केंद्राबाहेरून साहित्य पुरवून सामूहिक कॉपीचा प्रयत्न दिसुन येत असल्याचे चौकशी समितीने आपल्या अहवालात नमुद केले.

त्यामुळे प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे यांच्या तक्रारीवरून चामोर्शी पोलिसांनी परीक्षा केंद्रावरील गैरप्रकाराला जबाबदार धरून तीन शिक्षक आणि एका शिपायाविरूद्ध महाराष्ट्र विद्यापिठ मंडळ आणि इतर विशिष्ठ गैरप्रकार कायदा 1982 मधील कलम 7, 8 सहकलम 3(5) भा.न्या.सं 2023 नुसार गुन्हा दाखल केला. एवढेच नाही तर त्यांना निलंबित करण्याचा आदेश शिक्षण विभागाने संबंधित संस्थेला दिला असल्याचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे यांनी सांगितले.

निलंबित व गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये केंद्र संचालक महेंद्र बुर्लावार (सहाय्यक शिक्षक), रनर तथा सहायक परीरक्षक सुशील लांजेवार (सहाय्यक शिक्षक, महात्मा गांधी वि‌द्यालय घोट), महेंद्र किरमे (सहाय्यक शिक्षक, जा.कृ. बोमनवार माध्यमिक वि‌द्यालय तथा कनिष्ठ विज्ञान व कला महावि‌द्यालय, चामोर्शी) आणि सुरज केळझरकर (शिपाई, जा कृ बामनवार माध्यमिक वि‌द्यालय तथा कनिष्ठ विज्ञान व कला महावि‌द्यालय, चामोर्शी) या चार जणांचा समावेश आहे. अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि समाधान दौंड करीत आहेत.