गडचिरली : गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्रातील विविध भागांसह गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसासोबत वादळी वाऱ्याचा आणि गारपिटीचा तडाखा बसला आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः मका पिकाची मोठी हानी झाल्याने शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्यासाठी नुकसानीचे लवकर पंचनामे करा, अशी सूचना माजी खासदार डॅा.अशोक नेते यांनी संबंधित यंत्रणेला केली आहे.
दि.23 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन व्याहाड बुज, सामदा, वाघोली बुट्टी भागात वादळी पाऊस, आणि काही भागात गारपीटही झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे मका पिके आडवी पडून कणसांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने तूर, कापूस, सोयाबीन तसेच भाजीपाला पिकांनाही फटका बसला आहे.
शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने घेतलेले पीक काही क्षणात उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्या हाती निराशा येऊन चिंतेचे सावट पसरले आहे. या नैसर्गिक आपत्तीची गांभीर्याने दखल घेत माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी नुकसानीची माहिती घेतली. त्यांचे सहाय्यक तथा सोशल मीडिया प्रमुख दिवाकर गेडाम, भाजपाचे सावली तालुकाध्यक्ष किशोर वाकुडकर व भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष नितीन कारडे यांनी नुकसानीची सविस्तर माहिती दिली. माहिती मिळताच डॉ.नेते यांनी संबंधित प्रशासनाशी संपर्क साधून नुकसानग्रस्त भागात त्वरीत पंचनामे करण्याची सूचना केली.
“मी सध्या मुंबई येथे असलो तरी या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या अडचणींकडे माझे लक्ष आहे. प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता तात्काळ पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करावा आणि शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत मिळवून द्यावी,” अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. मुंबईहून परतल्यानंतर स्वतः नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणार असून शासन दरबारी हा विषय प्राधान्याने मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांनी 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत तसेच पिकांच्या नुकसानीची छायाचित्रे जोडून तहसील कार्यालय व कृषी विभागाकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
































