आरमोरी : मित्रांसोबत आंघोळीसाठी वैनगंगा नदीवर गेलेल्या आरमोरी येथील एका युवा अभियंत्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शुभम नामदेव रामटेके (25 वर्ष) असे त्याचे नाव आहे. भंगारच्या छोट्या व्यवसायातून कष्ट करून वडिलांनी एकुलता एक मुलगा असलेल्या शुभमला अभियंता केले होते. दोन महिन्यांपूर्वीच तो एका कंपनीत नोकरीला लागला असताना ही दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, शुभम हा सकाळी 10 वाजता वैनगंगा नदीवर मित्रांसोबत आंघोळ करण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गटांगळ्या खात बुडाला. मित्रांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले, पण त्यात यश आले नाही. मासेमाऱ्यांच्या मदतीने त्याचा शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह हाती लागला.
शुभम हा कुटुंबात एकटाच मुलगा होता. त्याला एक बहिण आहे. वडील भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. गरीबीच्या परिस्थितीतून वडीलांनी त्याला शिकवून इंजिनिअर केले होते. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी एका कंपनीत त्याला नोकरीली लागली होती. पण सुखाचे दिवस अनुभवण्याआधीच रामटेके कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
































