Home पब्लिक प्रॉब्लेम 21 दिवसांत 3156 युवक-युवतींना मिळाला मोफत भोजनासह निवारा

21 दिवसांत 3156 युवक-युवतींना मिळाला मोफत भोजनासह निवारा

पोलिस भरतीसाठी रायुकाँचा उपक्रम

गडचिरोली : जिल्हा पोलीस दलाच्या शिपाईपदाच्या भरतीत मैदानी चाचण्यांकरिता येणाऱ्या जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील युवक-युवतींची गडचिरोलीत गैरसोय होऊ नये याकरीता राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मदतीचा हात पुढे करत निवास व भोजनाची नि:शुल्क व्यवस्था केली. 10 फेब्रुवारी ते 6 मार्च 2026 दरम्यानच्या 21 दिवसांच्या या उपक्रमात रा.यु.काँ.ने 3156 युवक-युवतींना आधार दिला आहे.

यापुर्वी सुद्धा गडचिरोलीत झालेल्या पोलीस भरतीदरम्यान अनेक युवक-युवतींना कठिण परीस्थितीचा सामना करावा लागला होता. एकाच दिवशी 1000 ते 1200 उमेदवार पोलीस भरतीसाठी येत होते. भल्या पहाटे मैदानावर पोहोचणे गरजेचे असल्याने अनेकांना रात्रीची विश्रांती करणे कठिण होत होते. अनेक युवक-युवती रस्त्याच्या बाजूला, शासकिय कार्यालयाच्या आवारात, सामान्य रुग्णालय व बस स्थानकांच्या आवारात आश्रय घेत असत. यातून त्यांना होणाऱ्या त्रासामुळे त्यांची शारीरिक चाचणीदरम्यान एकाग्रता राहात नसल्याने त्यांच्या मैदानी चाचण्यांवरही त्याचा परिणाम दिसून येत होता.

ही परिस्थिती पाहून उमेदवारांची गैरसोय टाळण्याकरीता सन 2022 पासून प्रत्येक पोलीस भरतीच्या वेळेस, तसेच वनविभागाच्या वनरक्षक पदाच्या भरतीदरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांनी मोफत निवास-भोजनाचा उपक्रम राबविण्यास सुरूवात केली.

आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, श्रीनिवास गोडसेलवार,‍ ऋषीकांत पापडकर यांच्या सहकार्याने रा.यु.कॉ.चे जिल्हाध्यक्ष व नगर परीषद पाणी पुरवठा सभापती लिलाधर भरडकर यांनी सेमाना बॉयपास मार्गावरील ‘ग्रँन्ड हॉटेल’मध्ये ही नि:शुल्क व्यवस्था केली.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शहर अध्यक्ष अमोल कुळमेथे, जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पवार, तालुका अध्यक्ष कृणाल चिलगेलवार, हिमांशु खरवडे, शहर अध्यक्ष अविनाश कायरकर, मंथन बुलबुले , संकेत जनगणवार, विद्यार्थी अध्यक्ष चेतन पेंदाम, कार्तिक बुलबुले, सुजल सोरते, बादल गडपायले अशा अनेक पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

लेखी परीक्षेसाठी येणाऱ्यांचीही होणार व्यवस्था

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व व्यवस्थेचे नियोजन करताना “स्वप्नझेप” ॲकेडमीचे संचालक सुमित चव्हाण यांनीहीसुद्धा मार्गदर्शन केले. पोलीस मुख्यालयापासून अवघ्या 300 मीटर अंतरावरील या ठिकाणी युवक-युवतींसाठी उत्तम अशी निवासाची सोय करण्यात आली. उमेदवारांना शारीरिक चाचणीदरम्यान आरोग्यासाठी उत्तम असे वरण, भात, पोळी, भाजी असा पौष्टीक आहार देण्यात आला. ग्रामीण भागातून येणाऱ्या युवक-युवतींची गैरसोय होऊ नये या निस्वार्थ भावनेने आपण हा उपक्रम मागील 5 वर्षापासुन राबवत आहे. मैदानी चाचण्यांप्रमाणेच लेखी परीक्षेसाठी निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांचीही योग्य पद्धतीने व्यवस्था केली जाईल, असे रायुकाँचे जिल्हाध्यक्ष तथा न.प.चे पाणी पुरवठा सभापती लिलाधर भरडकर यांनी सांगितले.