गडचिरोली : मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मांडलेल्या 2026-27 च्या अर्थसंकल्पात गडचिरोली जिल्ह्याला औद्योगिक क्षेत्रात जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी ‘स्टील हब’ची घोषणा केली. जिल्ह्यात स्टिल उद्योगात तब्बल 2 लाख 61 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित करण्यात आली असून त्यातून 70 हजार 895 युवकांना थेट रोजगार मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना स्पष्ट केले. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री, तर अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल हे सहपालकमंत्री असल्याने गडचिरोली जिल्ह्याचा आर्थिक अनुशेष ते भरून काढतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
जिल्ह्याला दळणवळणाच्या बाबतीत परिपूर्ण करण्यासाठी विमानतळ आणि समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्याचे मोठे पाऊल उचलले आहे. गडचिरोलीतील प्रस्तावित विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडताना सांगितले. पर्यावरण संतुलनासाठी राज्यात 300 कोटी, तर गडचिरोली जिल्ह्यात 5 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
आकांक्षित गडचिरोली जिल्ह्याला समृद्धी महामार्गाने जोडण्यासोबत पायाभूत सुविधांवर भर देण्यात येणार आहे. नागपूर ते चंद्रपूर आणि भंडारा ते गडचिरोली अशा समृद्धी महामार्गाच्या विस्ताराची घोषणा करण्यात आली. यामुळे दळणवळण वेगवान होऊन उद्योगांना चालना मिळेल. तसेच खनिज वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यांची पुनर्बांधणी करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली.
‘बिरसा’ योजनेतून आदिवासी युवांना बळ
आदिवासीबहुल असलेल्या या जिल्ह्यातील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी ‘भारत इनोव्हेशन, रिसर्च, स्टार्टअप्स फॉर आत्मनिर्भरता’ ही विशेष योजना राबविली जाणार आहे. यातून नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना प्रोत्साहन दिले जाईल.
शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी आणि ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेत गडचिरोलीतील शेतकऱ्यांना प्राधान्य राहणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
































