चामोर्शी : बिल्ट आष्टी पेपर मिलच्या तब्बल 292.5 एकर जमिनीची विक्री करून सुमारे 400 कामगारांना बेरोजगारी व उपासमारीच्या संकटात ढकलल्याच्या निषेधार्थ 24 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाला भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अॅड.विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी भेट देऊन कामगारांशी संवाद साधला. तसेच पेपर मिल परिसराची पाहणी केली.
कामगारांच्या आरोपानुसार, बिल्ट आष्टी पेपर मिलची जमीन परस्पर लॅायड्स मेटल्स या कंपनीला विकण्यात आली. कोणतीही पूर्वसूचना न देता करण्यात आलेल्या या जमीन विक्रीमुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला. कामगारांच्या म्हणण्यानुसार, मागील चार ते पाच वर्षांपासून मिलमधील परिस्थिती जाणीवपूर्वक ढासळविण्यात आली. मिलचे काम टप्प्याटप्प्याने बल्लारशाह येथे हलवून अखेर 1991 पासून सुरू असलेल्या उत्पादन प्रक्रियेवर पूर्णविराम देण्याचा डाव रचण्यात आल्याची शंका कामगारांनी व्यक्त केली आहे.
सध्या पेपर मिल संकुलात नव्या समुहाकडून स्वच्छता, दुरुस्ती व इतर कामे सुरू आहे. यामागे प्लांट पूर्णपणे बंद करण्याचा कट असल्याचा आरोप कामगार संघटनेने केला आहे.
अशा आहेत कामगारांच्या मागण्या
* तृतीय पक्षासाठी जमीन विक्री न करता ती उद्योगासाठीच राखीव ठेवावी.
* विद्यमान पायाभूत सुविधा जतन करून प्लांट पुन्हा सुरू करावा.
* सुमारे 400 कामगारांचे रोजगार कायमस्वरूपी सुरक्षित करावेत.
उपोषणस्थळी कामगार युनियनचे सचिव विधानचंद्र बॅनर्जी यांनी स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, “निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले कामगार इतरत्र स्थलांतरास तयार नाहीत. आम्ही इथून कुठेही जाणार नाही.”
यावेळी गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितेश राठोड, ज्येष्ठ नेते विनोद पाटील येलमुले, नानाभाऊ पसफुलवार, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रेमानंद गोंगले, बंडूजी चापले तसेच मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते. कामगारांच्या प्रश्नावर शासन व व्यवस्थापनाने योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.
































