Home दैनंदिन बातम्या पोलिसांच्या हेलिकॅाप्टरमुळे वाचले दुर्गम लाहेरीतील गंभीर रुग्णाचे प्राण

पोलिसांच्या हेलिकॅाप्टरमुळे वाचले दुर्गम लाहेरीतील गंभीर रुग्णाचे प्राण

वैद्यकीय मदतीसह केले 'एअर लिफ्ट'

गडचिरोली : जलमय झालेल्या भामरागडचा इतर गावांशी संपर्क तुटलेला आहे. त्यामुळे लाहेरीतील एका सर्पदंश झालेल्या इसमाचे प्राण वाचवण्यासाठी गडचिरोलीतून हेलिकॅाप्टरने वैद्यकीय चमू पाठवून त्या इसमावर तातडीने उपचार करत त्याला पुढील उपचारासाठी हेलिकॅाप्टरने गडचिरोलीत आणण्यात आले. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या या तत्परतेमुळे एका इसमाचा जीव वाचवण्यात यश आले.

पूरपरिस्थितीमुळे शुक्रवारी भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलेला असताना भामरागड तालु्क्यातील लाहेरी येथील रहिवासी शामसुंदर नरोटी (35 वर्ष) यांची प्रकृती विषबाधा किंवा सर्पदंशासारख्या कारणाने गंभीर झाली होती. त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करणे गरजेचे होते. पण पूरस्थितीमुळे उपचारात अडचण असल्याची माहिती मिळताच गडचिरोली पोलीस दल व जिल्हा प्रशासनाच्या मदतीने तात्काळ हालचाल करून त्यांना योग्य आणि चांगल्या उपचारसाठी हेलिकॅाप्टरने गडचिरोलीला हलवण्याची व्यवस्था करण्यात आली.

गडचिरोली पोलिसांच्या हेलिकॉप्टरने वैद्यकीय अधिकारी डॅा.सुनील मडावी यांच्यासह पथकाला तात्काळ भामरागडसाठी रवाना करण्यात आले. त्यांनी तातडीचे उपचार करून नरोटी यांना सुरक्षितपणे गडचिरोलीला आणून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. आता त्यांची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

भामरागड परिसरातील नागरिकांनी आपत्कालीन परिस्थीतीत कुठल्याही अंधश्रध्देला बळी न पडता तात्काळ जवळच्या रुग्णालयात किंवा आपत्कालीन सेवांशी संपर्क करुन वेळेत उपचार मिळवावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी केले आहे.

एका रुग्णाला वाचविण्यासाठी केलेल्या धावपळीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भामरागड, पोस्टे भामरागड येथील अधिकारी व कर्मचारी, भामरागड तालुक्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी, पवनहंस पायलट अरविंद सैनी, राजीव शर्मा यांनी सहकार्य आणि समन्वय ठेवत धावपळ केली.