Home दैनंदिन बातम्या अटी शिथिल केल्याने कर्जमुक्तीसाठी जिल्ह्यातील 6 हजार 423 शेतकरी पात्र

अटी शिथिल केल्याने कर्जमुक्तीसाठी जिल्ह्यातील 6 हजार 423 शेतकरी पात्र

आर्थिक संकटातून बळीराजा बाहेर- नेते

गडचिरोली : राज्य शासनाने 2 जून आणि 15 जुलै रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’ जाहीर केली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यातील 6 हजार 423 शेतकरी पात्र ठरले असून, संबंधित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कर्जमुक्ती योजनेसोबत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची वीजबिल थकबाकीही माफ करण्यात आली. त्यामुळे आर्थिक संकटातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे सांगत देवाभाऊंच्या (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) नेतृत्वात दोन वेळा कर्जमुक्ती देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरल्याचे माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॅा.अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या पत्रकार परिषदेला आ.डॅा.मिलिंद नरोटे, माजी आ.डॅा.देवराव होळी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा.रमेश बारसागडे, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, डॅा.नितीन कोडवते, डॅा.चंदा कोडवते, प्रकाश गेडाम, नगरसेविका वर्षा शेडमाके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॅा.नेते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकारकडून शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आता आधुनिक पद्धतीने आणि अचूक असे डिजीटल पद्धतीने गुगल सर्व्हेक्षण केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून पैसे लाटण्यांना आता संधी नाही. आता कोणतीही निवडणूक समोर नसताना सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेऊन निवडणूक काळात दिलेले आश्वासन पूर्ण केल्याचे मा.खा.नेते म्हणाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत प्रत्येक पात्र शेतकऱ्याचे 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ केले जात आहे.

कर्ज परतफेड करणाऱ्यांना 50 हजारापर्यंत लाभ

सन 2023-24 अथवा 2024-25 या आर्थिक वर्षांत नियमितपणे किंवा पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीककर्जधारक शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. अशा शेतकऱ्यांना त्यांनी परतफेड केलेल्या कर्जाच्या रकमेनुसार प्रतिशेतकरी कमाल 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाकडून 24 जुलै २०२६ रोजी प्राप्त झाली. त्यानंतर 25 आणि 26 जुलै रोजी ही यादी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय, संबंधित सहाय्यक निबंधक कार्यालये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत, ग्रामीण व व्यापारी बँकांच्या शाखा, प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था तसेच गावपातळीवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे

पहिल्या टप्प्यात पात्र ठरलेल्या 6 हजार 423 शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर कर्जमाफीसंदर्भातील संदेशही पाठविण्यात आला आहे. संबंधित शेतकऱ्यांनी संदेशाची प्रतीक्षा न करता प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये आपले नाव तपासावे आणि आवश्यक प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. पात्र शेतकऱ्यांनी लाभ मिळण्यासाठी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आपल्या कर्ज खात्याचे बायोमेट्रिक अथवा आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत वितरित करण्यात आलेली, 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली अल्पमुदत पीककर्जाची थकीत मुद्दल व व्याजाची रक्कम विचारात घेतली जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या कर्ज खात्यातील एकत्रित थकीत मुद्दल आणि व्याजाच्या रकमेवर दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.