Home क्राईम स्कॅार्पिओच्या धडकेत दुचाकीस्वार पती ठार, पत्नी गंभीर जखमी

स्कॅार्पिओच्या धडकेत दुचाकीस्वार पती ठार, पत्नी गंभीर जखमी

बेशिस्त वाहतुकीचा पुन्हा एक बळी

गडचिरोली : शहरातील बेशिस्त वाहतुकीमुळे अपघात वाढत असताना त्यात गुरूवारी आणखी एका अपघाताची भर पडली. शहराच्या चामोर्शी मार्गावर गुरूवारी दुपारी एका भरधाव स्कॅार्पिओची दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक बसून झालेल्या अपघातात पतीचा मृत्यू, तर पत्नी गंभीर जखमी झाली. हा अपघात कैकाडी वस्तीकडे (समता नगर) जाणाऱ्या वळणावर घडला. (अधिक बातमी खाली वाचा)

या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव हेमंत देवनाथ शेंडे (46 वर्ष, रा.औंधी, जिल्हा मानपूर, छत्तीसगड, सध्या मुक्काम समता नगर, गडचिरोली) असे आहे. त्यांच्या पत्नी नीतू हेमंत शेंडे (37 वर्ष) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (अधिक बातमी खाली वाचा)

प्राप्त माहितीनुसार, स्कार्पिओ वाहन चामोर्शीकडून गडचिरोली शहराकडे येत होते. त्याचवेळी दुचाकीस्वार दाम्पत्य इंदिरा गांधी चौकाकडून समता नगरातील आपल्या घरी जाण्यासाठी निघाले होते. समता नगरच्या वळणाजवळ पोहोचताच दुचाकीस्वाराने अचानक उजवीकडे वळण घेतले. त्यामुळे स्कार्पिओ चालकाला वाहन नियंत्रित करणे शक्य झाले नाही आणि दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. (अधिक बातमी खाली वाचा)

अपघातानंतर स्कार्पिओ चालक सुधीर भुरले (रा.गडचिरोली) याने जखमी महिलेला व तिच्या पतीला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. त्यानंतर स्वतःच पोलीस ठाण्यात हजर होऊन अपघाताची माहिती दिली. (अधिक बातमी खाली वाचा)

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, दुचाकीस्वाराने वळण घेताना योग्य खबरदारी घेतली नाही. समोरून येणाऱ्या वाहनाकडे लक्ष न देता घाईघाईत वाहन वळविल्यामुळे हा अपघात झाल्याचे नागरिकांनी सांगितले.