गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या विकासावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने काँग्रेसकडून करण्यात आलेले आरोप वस्तुस्थितीला धरून नसल्याचे सांगत जिल्ह्यातील विकास कामांची माहिती देण्यात आली. मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे गडचिरोली जिल्हा विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहे. मात्र या विकासकामांवर विरोधकांकडून राजकीय हेतूने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याचा दावा भाजपच्या वतीने करण्यात आला.
माजी खासदार डॉ.अशोक नेते यांच्या निवासी कार्यालयात घेतलेल्या या पत्रकार परिषदेला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा.रमेश बारसागडे, आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.देवराव होळी, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, नगराध्यक्ष अॅड.प्रणोती सागर निंबोरकर, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, डॅा.चंदा कोडवते, शहराध्यक्ष तथा न.प.सभापती सीमा कन्नमवार, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, ज्येष्ठ नेते डॉ.भारत खटी, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, संजय बारापात्रे, सलीम शेख आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना भाजप पदाधिकारी म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या विकासाला व्यापक दिशा मिळाली असून, उद्योग, रोजगार, रेल्वे, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात गडचिरोली विकासाच्या नव्या टप्प्यावर पोहोचत आहे.
नव्या ओळखीसह विकासाच्या नव्या पर्वाकडे
पूर्वी गडचिरोलीची ओळख नक्षलग्रस्त व मागास जिल्हा अशी केली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांत सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासोबतच रस्ते, पूल, दळणवळण, प्रशासकीय सुविधा आणि विकासाच्या विविध प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. दुर्गम व आदिवासीबहुल भागांना मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी रस्ते व पुलांच्या माध्यमातून संपर्कव्यवस्था मजबूत करण्यावर भर देण्यात आला. यामुळे शिक्षण, आरोग्य, बाजारपेठ आणि रोजगाराच्या संधींपर्यंत पोहोचण्यास नागरिकांना मदत होत असल्याचा दावा भाजपने केला.
गडचिरोली ‘स्टील हब’च्या दिशेने वाटचाल
गडचिरोलीच्या औद्योगिक विकासाचा मुद्दा पत्रकार परिषदेत विशेषत्वाने मांडण्यात आला. सुरजागड परिसरातील लोहखनिजाच्या उपलब्धतेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात स्टील उद्योगाचा विस्तार करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचे भाजपने नमूद केले. सुरजागड व कोनसरी परिसरातील औद्योगिक प्रकल्पांमुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उद्योगांसोबतच स्थानिक युवकांसाठी कौशल्य विकास व प्रशिक्षणाच्या संधी वाढविण्यावर भर देण्याची गरज असल्याचेही भाजपने सांगितले. खनिज संपत्तीवर आधारित केवळ उत्खनन न करता त्यावर आधारित मूल्यवर्धित उद्योग उभारल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
उद्योगासोबत स्थानिक युवकांना रोजगाराची संधी
गडचिरोलीतील औद्योगिकीकरणाचा लाभ स्थानिक नागरिकांना मिळावा यासाठी उद्योग, कौशल्य विकास आणि रोजगार यांचा समन्वय आवश्यक असल्याचे भाजपने स्पष्ट केले. स्थानिक आदिवासी युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना औद्योगिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, स्थानिक व्यवसायांना चालना देणे आणि जिल्ह्यातील अर्थव्यवस्था मजबूत करणे या दिशेने प्रयत्न होत असल्याचेही पत्रकार परिषदेत नमूद करण्यात आले.
आरोग्य सुविधांच्या विस्तारावर भर
गडचिरोलीतील आरोग्य सुविधांचा विस्तार हा पत्रकार परिषदेतील महत्त्वाचा विषय ठरला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे वैद्यकीय शिक्षणासोबतच तज्ज्ञ वैद्यकीय सेवांच्या विस्ताराला मदत होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दुर्गम भागातील नागरिकांना वेळेत वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी आपत्कालीन आरोग्यसेवा, 108 रुग्णवाहिका तसेच भौगोलिक अडचणी असलेल्या भागांमध्ये बोट ॲम्बुलन्ससारख्या पर्यायी सुविधांचा वापर करण्यात येत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.
रेल्वेसह दळणवळणाच्या प्रकल्पांना गती
गडचिरोलीच्या औद्योगिक व आर्थिक विकासासाठी रेल्वे कनेक्टिव्हिटी अत्यंत महत्त्वाची असल्याचे भाजपने सांगितले. वडसा– गडचिरोली रेल्वे प्रकल्पासह रस्ते, पूल आणि इतर दळणवळणाच्या सुविधा जिल्ह्याच्या भविष्यातील विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. रेल्वे व रस्ते संपर्काचा विस्तार झाल्यास उद्योग, कृषी, खनिज वाहतूक, व्यापार आणि स्थानिक व्यवसायांना त्याचा फायदा होऊ शकतो, अशी भूमिका पत्रकार परिषदेत मांडण्यात आली.
60 वर्षांत काय केले?– भाजपचा काँग्रेसला सवाल
पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या दीर्घकालीन सत्ताकाळावरही भाजपच्या वक्त्यांनी प्रश्न उपस्थित केले. काँग्रेसच्या दीर्घकाळाच्या सत्ताकाळात गडचिरोलीच्या विकासाला अपेक्षित गती मिळाली नाही, असा आरोप भाजपने केला.“दशकानुदशके प्रलंबित राहिलेल्या प्रश्नांवर आता काम सुरू झाले असताना, प्रत्येक विकासकामात राजकारण शोधण्यापेक्षा काँग्रेसने वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी,” अशी अपेक्षा भाजपच्या वतीने व्यक्त करण्यात आली. जिल्ह्याच्या दीर्घकालीन विकासासाठी आरोप-प्रत्यारोपांपेक्षा विकासकामांची वस्तुनिष्ठ माहिती आणि त्याचा नागरिकांना होणारा लाभ यावर चर्चा व्हावी, असेही भाजपने म्हटले. गडचिरोलीच्या विकासाच्या प्रश्नावर राजकीय मतभेद असले तरी जिल्ह्यातील विकासकामांची प्रत्यक्ष प्रगती, प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्याचा स्थानिक नागरिकांना होणारा लाभ याबाबत तथ्याधारित चर्चा व्हावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
गडचिरोलीकडे फडणवीसांचे विशेष लक्ष
मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकडे विशेष लक्ष असल्याचे डॉ.अशोक नेते यांनी नमूद केले. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. राज्याच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतानाच गडचिरोलीच्या विकासाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी प्रत्यक्षात मुक्काम करून स्थानिक प्रश्न समजून घेण्याची त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. गडचिरोलीसोबतच संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाकडे त्यांचे लक्ष आहे,” असे डॉ.नेते यांनी सांगितले.
































