
गडचिरोली : हिंसाचाराचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होणाऱ्या आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचा सर्वंकष विकास होऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सहभागी होणे सुसह्य व्हावे यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने अहेरी येथे गुरूवारी पहिल्यांदाच जनजागरण मेळावा घेण्यात आला. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट संजीवनीच्या माध्यमातून या पुनर्वसन कालावधीत केवळ प्रशासकीय प्रक्रिया न राबवता आत्मसमर्पित सदस्यांना नवीन ओळख, आत्मविश्वास, कौशल्य आणि सन्मानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांना या मेळाव्याच्या माध्यमातून विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
या जनजागरण मेळाव्याच्या माध्यमातून आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना शासनाच्या विविध पुनर्वसन योजना, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, कौशल्य विकास तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जीवन जगण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती देण्यात आली. तसेच पूर्वी आत्मसमर्पण केलेल्या माओवादी सदस्यांच्या प्रलंबित समस्या व अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासोबतच, शासनाच्या विविध पुनर्वसन योजना व उपलब्ध सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सदर जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्यादरम्यान आधार कार्ड, ई-श्रम कार्ड, महासारथी कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड व आभा कार्ड काढून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात त्यांना वाटप करण्यात आले. गडचिरोली आणि अहेरी येथे आयोजित मेळाव्यांमध्ये आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देऊन एकूण 313 जणांना विविध शासकीय योजनांचे दाखले काढून देण्यात आले. यासोबतच तज्ज्ञ वैद्यकीय पथकाकडून आत्मसमर्पित माओवादी सदस्यांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली.
या मेळाव्यात पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की, ‘गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट संजीवनीच्या माध्यमातून आत्मसमर्पितांना आतापर्यंत विविध प्रकारची मदत देण्यात आली आहे. आत्मसमर्पित सदस्यांनी आपल्या कौशल्याचा उपयोग करुन आत्मनिर्भर बनावे, कुटुंबासोबत सुरक्षित व सुखी जीवन जगावे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने पुढे जावे,’ असे आवाहन त्यांनी केले.
या मेळाव्यासाठी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) हर्षवर्धन बी.जे., सहा.पोलीस अधीक्षक (गडचिरोली) अनिकेत हिरडे, सहा.पोलीस अधीक्षक (भामरागड) सागर भामरे, सहा.पोलीस अधीक्षक (धानोरा) सुयश कुमार सिंग, तसेच पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील उईके, उपविभागीय पोलीस अधिकारी (कुरखेडा) प्रमोद मडामे, उपविभागीय पोलीस अधिकारी (सिरोंचा) समाधान पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी (जिमलगट्टा) राहुल मडावी, उपविभागीय पोलीस अधिकारी (अहेरी) हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पण शाखा गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोउपनि.नरेंद्र पिवाल, पोउपनि.विक्रम बुरंगे, मपोउपनि.प्रतीक्षा राठोड व पोलीस अंमलदारांनी परिश्रम घेतले.
































