गडचिरोली : प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या विक्री व वाहतुकीवर अंकुश लावण्यासाठी पोलिसांनी गोपनिय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत एका सहाचाकी ट्रकसह मोठ्या प्रमाणावर सुगंधीत तंबाखू पकडला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह आरमोरी पोलिसांनी कुरखेडा ते आरमोरी मार्गावर सापळा रचून केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ट्रकमधून प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखूची वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने कुरखेडा ते आरमोरी मार्गावर सापळा रचून संबंधित संशयित वाहनाला थांबवून तपासणी केली असता त्यात 13 पांढऱ्या रंगाच्या चुंगळ्यांमध्ये बागबान चेविंग टोबॅकोचे 520 बॉक्स (प्रती बॉक्स 2700 रुपये) प्रमाणे एकूण 14 लाख 4,000 रुपये किमतीचा तंबाखू, तसेच 60 पांढया रंगाच्या चुंगळ्यांमध्ये डीजे प्रिमीयम क्वालिटी सुगंधीत तंबाखूचे 1320 पाऊच (प्रतीपाऊच विक्री किंमत 450 रुपये) प्रमाणे एकूण किंमत 5 लाख 94 हजार रुपये, 80 चुंगळ्यांमध्ये झेड ब्लॅक प्रिमीयम क्वालिटी सुगंधीत तंबाखूचे 1600 पाऊच (प्रतीपाऊच विक्री किंमत 350 रुपये) असा एकूण 30 लाख रुपये किमतीचा तंबाखू आणि आयशर कंपनीचा मालवाहू सहाचाकी ट्रक (क्र.सीजी 08, झेड 8792, अंदाजे किंमत 15 लाख) असा एकूण 45 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.
ट्रकसह मिळून आलेला सर्व मुद्देमाल पोलीस ठाणे आरमोरी येथे आणण्यात आला. अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना पाचारण करून खात्री करण्यात आली. पंचासमक्ष केलेल्या चौकशीत वाहनचालकाने आपले नाव शाहू धर्मेशकुमार इंदेरमन (28 वर्षे), रा.जोशीलमती, गेंदाटोला, जि.राजनांदगाव (छत्तीसगड) असे सांगितले. सदर वाहन चालकास अधीक विचारपूस केली असता, सदर माल हा टेमन बेदराम साहू, रा.जोशीलमती, जि.राजनांदगाव (छ.ग.) यांचा असल्याचे सांगितले.
अन्न सुरक्षा अधिकारी सुरेश तोरेम यांच्या फिर्यादीवरुन आरमोरी पोलिसांनी शाहु धर्मेशकुमार इंदेरमन (28 वर्षे), तसेच टेमन बेदराम साहू, रा.जोशीलमती, जि.राजनांदगाव (छ.ग) यांच्याविरुध्द अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम-2006 आणि इतर विविध कलमांखाली गुन्हा नोंद करून एका आरोपीला अटक केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.रमेश, अपर पोलीस (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., सहा.पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली पोलीस निरीक्षक अरुण फगडे, तसेच पोलीस स्टेशन आरमोरीचे प्रभारी अधिकारी सचिन झनक यांच्या नेतृत्वात पोउपनि/ विश्वभंर कराळे व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.
































