
आरमोरी : श्रीराम नवमीच्या पावन पर्वानिमित्त आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव (भु.) येथे अतिशय उत्साहाच्या वातावरणात श्रीमद् भागवत सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. 26 मार्च पर्यंत चालणाऱ्या या आध्यात्मिक सोहळ्याने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान दि.21 मार्च रोजी भागवत सप्ताह कार्यक्रमास माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी प्रमुख उपस्थिती लावली. यावेळी भाविकांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, “भागवत सप्ताह हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून तो आपल्या आचार, विचार आणि संस्कारांना दिशा देणारा आध्यात्मिक महोत्सव आहे. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात अशा कार्यक्रमांची नितांत गरज आहे,” असे डॉ.नेते म्हणाले.
या कार्यक्रमादरम्यान भागवत सप्ताह मंडळाच्या वतीने मा.खा.डॉ.नेते यांचे भगवी टोपी व दुपट्टा परिधान करून सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. डॅा.नेते यांच्या उपस्थितीमुळे वातावरण अधिकच उत्साही झाले होते.
याप्रसंगी भाजपचे जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, लोचन धोरे, भाजप युवा नेते विकास पायडलवार, भास्कर खरकाटे, हरीश राऊत, लोमेश सहारे, बुधाजी सेलोटे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला गावातील तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण भागवत सप्ताहात हरिनामाचा गजर, भागवत कथामृत आणि कीर्तनांच्या माध्यमातून गावकऱ्यांना अध्यात्मिक ऊर्जा मिळत असून, या उपक्रमामुळे समाजात सद्भावना व संस्कारांची बीजे रुजत असल्याचे चित्र दिसून आले.
































