Home दैनंदिन बातम्या 6971 उमेदवारांनी दिली कडक सुरक्षेत पोलीस भरतीची परीक्षा

6971 उमेदवारांनी दिली कडक सुरक्षेत पोलीस भरतीची परीक्षा

गैरप्रकार टाळण्यासाठी जामर

गडचिरोली : पोलीस भरतीची मैदानी चाचणी पार केल्यानंतर पात्र ठरलेल्या 6971 उमेदवारांनी रविवारी लेखी परीक्षा दिली. गडचिरोली शहरातील 14 केंद्रांवर एकाचवेळी कडक सुरक्षा व्यवस्थेत ही परीक्षा घेण्यात आली. काही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार टाळण्यासाठी सिग्नल जामरचाही वापर करण्यात आला. एक हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या देखरेखीत ही परीक्षा शांततेत पार पडली.

या परीक्षेत दोन पेपर घेण्यात आले. पेपर संपल्यानंतर परीक्षार्थींना पडताळणी करण्यासाठी उत्तर पत्रिकाही गडचिरोली पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली. आक्षेप घेण्यासाठी 24 तासांची मुदत उमेदवारांना देण्यात आली आहे.

पोलीस शिपाईपदाच्या 717 जागांसाठी झालेल्या या लेखी परीक्षेसाठी एकूण 7003 उमेदवारांची निवड केली होती. त्यापैकी 6971 उमेदवार लेखी परीक्षेला हजर झाले. गडचिरोली शहरातील एकूण 14 केंद्रांवर रोल नंबरनिहाय बैठक व्यवस्था लावली होती. उमेदवारांना वेळेत केंद्रावर पोहोचता यावे यासाठी गुगल मॅप लोकेशनही पाठविण्यात आले होते. काही परीक्षा केंद्रांवर सुरक्षा व्यवस्थेकरिता सिग्नल जामरचाही उपयोग करण्यात आला.

सकाळी 10 ते 11.30 वाजतादरम्यान पहिला पेपर सामान्य अध्ययन, तर दुसरा पेपर दुपारी 1 ते 2.30 दरम्यान गोंडी व माडीया भाषेवर आधारित घेण्यात आला. परीक्षेच्या बंदोबस्ताकरीता 166 पोलीस अधिकारी, 693 पोलीस अंमलदार तसेच 132 शिक्षक व मंत्रालयीन कर्मचारी असे एकूण 1000 च्या संख्येने मनुष्यबळाची नेमणूक करण्यात आली होती.

बायोमेट्रिक पद्धतीने प्रवेश

लेखी परीक्षेदरम्यान गैरप्रकार घडू नये याकरिता उमेदवारांना प्रवेश देतानाच कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक साधनांबाबत मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने उमेदवारांची तपासणी केल्यानंतरच प्रवेश देण्यात आला. यासोबतच सर्व उमेदवारांना बायोमॅट्रीक पद्धतीने नोंदणीचे पुन:परिक्षण करुन त्यांना परीक्षा केंद्राच्या आत सोडण्यात आले. परीक्षेकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येऊन पारदर्शक पद्धतीने सदर परीक्षा पार पडली. पेपर क्र. 1 व पेपर क्र.2 च्या मधल्या वेळेत उमेदवारांसाठी नाश्त्याची देखील व्यवस्था करण्यात आली होती.

सदर लेखी परीक्षेसाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., सहाय्यक पोलीस अधीक्षक (गडचिरोली) अनिकेत हिरडे, पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे व उपविभागीय पोलीस अधिकारी (कुरखेडा) रविंद्र भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी (सिरोंचा) संदेश नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी (एटापल्ली) चैतन्य कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी (पेंढरी) जगदिश पांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (अहेरी) अजय कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी (जिमलगट्टा) राहुल मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व अंमलदारांनी देखरेखीची जबाबदारी पार पाडली.