Home राजकीय घडामोडी आरमोरीत भाजपच्या दोन दिवसीय निवासी कार्यशाळेची सांगता

आरमोरीत भाजपच्या दोन दिवसीय निवासी कार्यशाळेची सांगता

मा.आ.कृष्णा गजबे यांचे मार्गदर्शन

आरमोरी : पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान-2026 अंतर्गत भारतीय जनता पक्षाच्या आरमोरी मंडळातर्फे बल्लारपुरे हॉल, नवीन बस स्थानकासमोर येथे 8 व 9 एप्रिल रोजी दोन दिवसीय निवासी कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली.

या शिबिरातील ‘आपल्या सरकारची कामगिरी’ या सत्रात माजी आमदार कृष्णा गजबे यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा सविस्तर आढावा घेताना त्यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, आयुष्मान भारत योजनेतून मोफत उपचार, पीएम किसान सन्मान निधीतून शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये, पीएम उज्ज्वला योजनेतून गरीब महिलांना मोफत गॅस सिलींडर, जलजीवन मिशनद्वारे ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवठा, शेतकऱ्यांची कर्जमाफी, वंचित गावांना वीजपुरवठा अशा विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.

यावेळी गजबे पुढे म्हणाले, “प्रथम देश, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः, या ध्येयाने विकसित भारत घडविण्यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचवा. बुथस्तरावर संघटना मजबूत करून जनतेच्या विकासासाठी अखंड कार्य करा.” अशा सूचना त्यांनी दिल्या.

याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, ज्येष्ठ नेते रामभाऊ पडोले गुरुजी, आयटी सेलचे संयोजक आनंद खजांची, स्थानिक नगरसेवक व भाजप पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

शिबिरात बुथ मजबुतीकरण, सोशल मीडिया रणनिती, शासन योजनांचा प्रसार व आगामी कार्यक्रमांची तयारी यावर मार्गदर्शन झाले. संवादात्मक सत्रात कार्यकर्त्यांनी अनुभव व सूचना मांडल्या. या कार्यशाळेमुळे कार्यकर्त्यांना नवीन दिशा व ऊर्जा मिळाली असून पक्ष-संघटना बळकटीकरणासाठी प्रेरणा लाभल्याची भावना सहभागींनी व्यक्त केली.