Home दैनंदिन बातम्या तीन तालुक्यातील सहा कृषी केंद्रांना विक्रीबंदीचे आदेश

तीन तालुक्यातील सहा कृषी केंद्रांना विक्रीबंदीचे आदेश

40 पेक्षा अधिक केंद्रांना नोटीस

कृषी केंद्रांची तपासणी करताना जिल्हास्तरीय भरारी पथक

गडचिरोली : कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील कृषी केंद्रांची तपासणी मोहीम सुरू आहे. जिल्हास्तरीय भरारी पथकाने तीन तालुक्यात केलेल्या तपासणीत सहा कृषी केंद्रांमध्ये अनियमितता आढळल्याने त्यांचे परवाने तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करत त्यांना कृषी निविष्ठा विक्री करण्यास बंदी घातली आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक आणि पिळवणूक होऊ नये यासाठी कृषी केंद्रांमधून खतं, बियाणे, कीटकनाशकांची विक्री करताना अनेक नियमांचे पालन करावे लागते. त्या नियमांची अंमलबजावणी केली जाते किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांच्या नेतृत्वात जिल्हास्तरीय भरारी पथकांनी तपासणी सुरू केली आहे.

कुरखेडा, देसाईगंज आणि चामोर्शी तालुक्यात केलेल्या तपासणीत सहा कृषी केंद्रांमध्ये नियमांचे पालन केले जात नसल्याचे आढळले. त्यामुळे त्यांना निविष्ठा विक्रीबंदीचे आदेश देण्यात आले. याशिवाय तालुकास्तरावर गुण नियंत्रण निरीक्षकांनी 61 केंद्रांची तपासणी केली. त्यात आढळलेल्या काही अनियमिततांसाठी 40 पेक्षा जास्त कृषी केंद्र संचालकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली.

या कारवाईत कृषी अधीक्षक कार्यालयातील गुण नियंत्रण अधिकारी संजय मेश्राम यांनीही सहभाग घेतला.