देसाईगंज : बौद्ध समाज तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन संस्था (विचार मंच) कोंढाळा यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन दि.16 एप्रिल रोजी सायंकाळी ग्रामपंचायत व्यासपीठ, कोंढाळा येथे केले होते. या कार्यक्रमाला बौद्ध उपासक, उपासिका तसेच गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना गजबे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिक्षण, समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाचा संदेश हा केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शक आहे. बाबासाहेबांचे विचार अंगीकारूनच समाजात खरी प्रगती आणि परिवर्तन घडू शकते, असे प्रतिपादन त्यांनी केले. संघटित राहून सामाजिक जाणीव अधिक मजबूत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमात सामाजिक विचारवंत प्रा.संजय मगर, ब्रह्मपुरी आणि दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष विजय बनसोड यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. त्यांनी प्रबोधनपर मार्गदर्शनातून बाबासाहेबांचे विचार, शिक्षणाचे महत्त्व, सामाजिक न्यायाची आवश्यकता आणि संघटनशक्तीवर सखोल विवेचन केले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील पारधी, माजी पं.स. उपसभापती नितीन राऊत, माजी जि.प. सदस्य रोशनी पारधी, सरपंच अपर्णा राऊत, विजय बन्सोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रात्री 8.30 वाजता अमित पिपरे यांच्या संकल्पनेतून आणि रुपाली राऊत यांच्या प्रस्तुतीत ‘न्यू सैराट कन्हैया डान्स ग्रुप, नागपूर’ यांचा भीम-बुद्ध गीतांवर आधारित नृत्याविष्कार सादर करण्यात आला. या सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
































