गडचिरोली : आदिवासी विकासमंत्री प्रा.डॉ.अशोक उईके आज (दि.25) गडचिरोली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते शासकीय आश्रमशाळांतील नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासंदर्भातील उपाययोजनांवर आयोजित कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात धान खरेदीच्या अनुषंगाने आढावा बैठकही घेणार आहेत.
विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या वाढविण्यासाठी कार्यशाळा
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या वतीने शासकीय आश्रमशाळांतील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन धानोरा मार्गावरील महाराजा सेलिब्रेशन हॉलमध्ये करण्यात आले आहे. यात नागपूर विभागातील गडचिरोली, अहेरी, भामरागड, चंद्रपूर, चिमूर, देवरी, भंडारा, वर्धा व नागपूर या नऊ प्रकल्पातील एकूण 76 शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक, अधीक्षक व वसतीगृहांचे गृहपाल सहभागी होणार आहेत. मंत्री डॉ.अशोक उईके कार्यशाळेला मार्गदर्शन करतील.
कार्यशाळेत राज्याचे आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आयुक्त लीना बन्सोड, नागपूर विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह, सहसचिव म.रं. शेळके, उपसचिव र.तु.जाधव, कक्ष अधिकारी स.वि.कोवे, नाशिक विभागाचे उपआयुक्त संतोष ठुबे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अरुण एम. आदींसह नागपूर विभागातील सर्व प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत.





























