Home दैनंदिन बातम्या मा.खा.डॉ.नेते यांची मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाला भेट

मा.खा.डॉ.नेते यांची मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाला भेट

'सर्व गरजूंना योजनेचा लाभ द्या'

गडचिरोली : गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाला शुक्रवारी माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी सदिच्छा भेट देत तेथील कार्यपद्धतीची सविस्तर माहिती घेतली.

यावेळी डॉ.नेते यांनी संबंधित अधिकारी डॉ.मनोहर मडावी, हर्षाली नैताम आणि इतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधून सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या आरोग्य योजनांचा अधिकाधिक लाभ कसा मिळेल, याबाबत चर्चा केली.

राज्यातील सर्वसामान्य, गरीब आणि गरजू नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणारे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने राबविलेल्या जनकल्याणकारी योजनांमुळे हजारो कुटुंबांना नवजीवन मिळत असल्याचे डॉ.नेते म्हणाले. मुख्यमंत्री सहायता निधी, आरोग्यविषयक मदत योजना आणि गरजू रुग्णांसाठी शासनाने उभारलेली सक्षम यंत्रणा ही जनतेप्रती संवेदनशील प्रशासनाचे उत्तम उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले. आर्थिक अडचणीत असलेल्या रुग्णांना उपचारासाठी तातडीने मदत मिळावी, यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्री सहायता निधी, आयुष्मान भारत योजनेसह विविध आरोग्यविषयक योजनांची माहिती घेताना डॉ.नेते म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने आरोग्य क्षेत्रात घेतलेले निर्णय हे गरीब आणि गरजू नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक आहेत. योग्य माहितीच्या अभावी कोणताही नागरिक योजनेपासून वंचित राहू नये. प्रत्येक गरजू व्यक्तीने शासनाच्या या सुविधांचा लाभ घ्यावा.” असे आवाहन त्यांनी केले.