देसाईगंज : “धर्म संस्कृतीची रक्षा कोण करणार? आम्ही करणार, आम्ही करणार!” अशा घोषणांनी शुक्रवारी देसाईगंज (वडसा) रेल्वे स्थानक परिसर दणाणून गेला. 24 मे रोजी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर आयोजित भव्य ‘जनजाती सांस्कृतिक समागम’ (महासंगम)मध्ये सहभागी होण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील 350 च्या वर जनजाती बांधवांचा मोठा जत्था दिल्लीकडे रवाना झाला. वडसा रेल्वे स्थानकावर या प्रवाशांना माजी आमदार कृष्णा गजबे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दाखवून निरोप दिला.
दिल्लीला जाणाऱ्या मोर्चाला आणि प्रवाशांना प्रोत्साहन देण्यासाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, राजेश जेठाणी, नगर परिषदेचे उपाध्यक्ष नरेश विठ्ठलानी आणि मंगेश गुरफुले प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांनी रेल्वे स्थानकावर पोहोचून सर्व जनजाती बांधवांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
या मोर्चाचे नेतृत्व व समन्वयामध्ये आदिवासी विदर्भ प्रांत हितरक्षा प्रमुख भगीरथ बेचानकुवर, प्रांत खेलकुद प्रमुख पंढरी दर्रो, आदिवासी पश्चिम क्षेत्र महिला प्रमुख जास्वंदा दर्रो, वनवासी कल्याण आश्रम जिल्हा सचिव प्रा.देवराव गजभिये, आनंद चौबे, सामाजिक कार्यकर्ते विनोद कोरेटी यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील तसेच विदर्भ प्रांतातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश आहे. रेल्वे स्थानकावर उपस्थित सर्व प्रवाशांनी सारख्याच प्रकारच्या पांढऱ्या व निळ्या रंगाच्या टोप्या परिधान केल्या होत्या, तसेच हातात विदर्भ प्रांत, जिल्हा गडचिरोलीचा अधिकृत फलक (बॅनर) धरून एकजूट दाखवली.
या समागमाच्या माध्यमातून जनजाती समाजाची संस्कृती, हक्क आणि परंपरा यांचे दर्शन दिल्लीतील लाल किल्ल्यावर घडणार आहे. निरोपाच्या वेळी संपूर्ण स्थानक परिसर उत्साहाने आणि जनजाती संस्कृतीच्या घोषणांनी भारावून गेला होता.
































