आलापल्ली : पोलिसांना चकमा देण्यासाठी खोटी नंबरप्लेट लावून एका बोलेरो वाहनातून अवैधपणे दारू वाहतूक करण्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. स्थानिक गुन्हे शाखा आणि अहेरी पोलीस स्टेशनच्या पथकाने सापळा रचून त्या वाहनाला पकडले. ही कारवाई आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोरील परिसरात रात्री करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला त्या बोलेरोसंदर्भात गोपनिय माहिती मिळाली होती. एमएच 12, एसएक्स 6981 अशी नंबरप्लेट लावलेली ती बोलेरो गाडी अवैधपणे देशी व विदेशी दारुची वाहतूक करुन विक्री करण्याकरीता उभी केलेली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा आणि अहेरी पोलिसांनी दोन पंचासह कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर जाऊन बघितले असता, त्या ठिकाणावर एक काळसर तपकिरी रंगाची बोलेरो कॅम्पर उभी असल्याचे दिसून आले.
बिअर, व्हिस्की आणि देशीही
त्या वाहनाची तपासणी केली असता, वाहनामध्ये 1) 500 मिली क्षमतेचे बियर टीन कॅनचे 46 खरड्याचे बॉक्स (प्रति बॉक्स 24 नग बिअर कॅन असे एकूण 1104 बिअर कॅन), ज्याची अवैध विक्री किंमत अंदाजे रु.300 प्रमाणे एकूण 3 लाख 31 हजार 200 रुपये 2) 90 एमएल क्षमतेच्या रॉकेट देशी दारुच्या 2200 निपा, (किंमत 1 लाख 76 हजार रुपये, 3) 2000 एमएल क्षमतेचे रॉयल स्टॅग डिलक्स विस्कीचे 120 बॅरल, (किंमत 4 लाख 80 हजार रुपये) आणि देशी व विदेशी दारु वाहतुकीकरीता वापरण्यात आलेली एक काळसर तपकिरी रंगाची बोलेरो कॅम्पर हे चारचाकी वाहन (किंमत अंदाजे 5 लाख) असा एकूण 14 लाख 87 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी अहेरी येथे दिलेल्या तक्रारीवरुन कलम 65 (अ) म.दा.का. अन्वये अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला. या गुन्ह्रातील आरोंपीचा शोध घेणे सुरु आहे. पुढील तपास अहेरीचे प्रभारी अधिकारी पोनि.हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोनि अरुण फेगडे, तसेच पोस्टे अहेरीचे प्रभारी अधिकारी पोनि हर्षल एकरे यांच्या नेतृत्वात स्थागुशाचे सपोनि भगतसिंग दुलत, पोअं/शिवप्रसाद करमे, रोहित गोंगले, चापोअं/संदीप भेंडारे, अहेरीचे पोहवा. राकेश करमे, नापोअं ज्ञानेश्वर निलावार, नितेश दाने व चापोअं/अनंत सातपुते यांनी पार पाडली.
































