गडचिरोली : वैनगंगा नदीची पाणी पातळी कमी झाल्याने नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेतून मर्यादित पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहराच्या बहुतांश भागात पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून वैनगंगा नदीचे पाणी अडविण्यासाठी तात्पुरता बंधारा बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान वैनगंगा नदीची पाणी पातळी वाढण्यासाठी गोसेखुर्द प्रकल्पातील पाणी सोडण्याची विनंती सहपालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन करण्यात आल्याची नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती लिलाधर भरडकर यांनी दिली.
वैनगंगेचे पाणी अडविण्यासाठी नगर परिषद प्रशासनाकडून पोकलँड आणि जेसीबीच्या सहाय्याने रेती-मातीचा तात्पुरता बंधारा बांधण्याचे काम सुरू आहे. या बंधाऱ्याचे काम आठवडाभरात पूर्ण होईल. यादरम्यान पुढील आठवड्यात गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी सोडल्यास आठवडाभरानंतर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत सुरू होईल, असे भरडकर यांनी सांगितले.
गडचिरोली शहरातील नागरिकांनी येत्या 30 जूनपर्यंत पाण्याचा वापर जपून करावा. पाण्याचा अपव्यय टाळून काळजीपूर्वक वापर करावा, असे आवाहन सभापती लिलाधर भरडकर यांनी केले आहे.
































