गडचिरोली : राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या दोन दिवसीय गडचिरोली दौऱ्यादरम्यान माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॅा.अशोक नेते यांनी त्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी विशेषतः धान खरेदी केंद्रांचा गंभीर प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी डॅा.नेते यांनी सादर केलेल्या निवेदनातून शेतकऱ्यांची व्यथा मांडली. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक धान खरेदी केंद्रांवर मागील हंगामात खरेदी केलेले धान अद्याप उचलण्यात आलेले नसल्यामुळे नवीन धान खरेदी प्रक्रियेला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. अनेक केंद्रांवर गोदामांची कमतरता असून मोठ्या प्रमाणात धान उघड्यावर पडून आहे. मान्सून सुरू झाल्याने हे धान पावसामुळे खराब होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
या विषयाकडे विशेष लक्ष वेधून तातडीने धान उचलण्याची सूचना संबंधित यंत्रणेला करावी, अशी मागणी डॅा.नेते यांनी केली. अतिरिक्त साठवणूक व्यवस्था निर्माण करून सर्व प्रलंबित धान खरेदी केंद्रे सुरू करण्याची सूचना त्यांनी केली.
याशिवाय ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या मार्कंडा देवस्थानाच्या विकासकामांचा मुद्दाही मुख्य सचिवांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. पुरातत्व विभागामार्फत मंजूर करण्यात आलेल्या निधीनंतरही विकासकामे अत्यंत संथगतीने सुरू असल्याने संबंधित विभागाला निर्देश देऊन कामांना गती देण्याची मागणी करण्यात आली.
तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास पॅकेज जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली. शिक्षण, आरोग्य, रस्ते, सिंचन, उद्योग, पर्यटन, मोबाईल नेटवर्क, इंटरनेट सुविधा व रोजगार निर्मिती यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
मुख्य सचिवांनी सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेतले. विशेषतः धान खरेदी केंद्रांच्या प्रश्नावर तातडीने लक्ष देण्याचे आश्वासन दिले. जिल्ह्यातील शेतकरी, युवक, महिला व सर्वसामान्य नागरिकांच्या हिताशी संबंधित प्रश्नांवर शासन स्तरावर सकारात्मक कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
































