गडचिरोली : जिल्ह्यात दारुबंदी असताना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतूक करण्याचा प्रयत्न केला जात असतो. अशा विविध सराईत गुन्हेगारांविरुध्द पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी कायदेशिर कारवाईचा फास आवळणे सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोरची पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खुर्शीपार येथील रहिवासी तिलक बाबुलाल उंदीरवाडे याला 6 महिन्यांसाठी गडचिरोली जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार) करण्यात आले.
उंदीरवाडे याच्याविरुध्द अवैध दारू विक्री, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणे, तसेच इतर गंभीर स्वरुपाचे विविध गुन्ह्यांची नोंद पोस्टे कोरची येथे आहे. संबंधित इसमाविरूद्ध पोस्टे कोरची येथे सन 2009 ते 2025 या कालावधीत महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमाच्या कलम 65 व इतर कलमानुसार एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. सदर इसमाविरोधात विविध प्रकारचे गुन्हे वारंवार दाखल होऊन सुद्धा संबंधित आरोपीमध्ये कुठलाही बदल झालेला नसल्याचे दिसून आल्याने कोरची पोलिसांकडून उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कुरखेडा यांच्याकडे संबंधित आरोपीविरुध्द हद्दपार प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कुरखेडा यांनी सदर प्रस्तावाबाबत चौकशी करून तिलक उंदिरवाडे याच्या हालचालींमुळे समाजातील नागरिकांच्या जिवितास, मालमत्तेस धोका किंवा इजा निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याची खात्री केल्यानंतर आणि त्याची इतर गुन्ह्रांची पार्श्वभूमी आणि सद्यस्थिती पाहता महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (1) (अ) अन्वये गडचिरोली जिल्ह्राच्या हद्दीतून 6 महिन्यांसाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला. सदर आरोपीने तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याला अटक करुन त्याच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
गडचिरोली जिल्ह्रातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा सराईत गुन्हेगारांविरोधात अधिक सक्तीने कठोर कारवाई करण्यात येणार असून यापुढे देखील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई व तडीपार याप्रमाणे कठोर कारवाईचा अंमल करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी स्पष्ट केले.
































