अहेरी : अनुसूचित जमातीच्या (एसटी) बोगस जात प्रमाणपत्रांच्या गंभीर प्रश्नावर अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी पावसाळी अधिवेशनात विधानसभेत आक्रमक भूमिका घेत सरकारचे लक्ष वेधले. त्यांनी बोगस जात प्रमाणपत्रांचे संपूर्ण रॅकेट उघड करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
सभागृहात प्रश्न उपस्थित करताना आ.डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी अनुसूचित जमातीच्या नावावर आतापर्यंत किती बोगस जात प्रमाणपत्रे देण्यात आली, त्याची संपूर्ण आकडेवारी सरकारने जाहीर करावी, तसेच अशा सर्व बोगस प्रमाणपत्रांना तातडीने रद्द करून संबंधित व्यक्ती व अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. बोगस जात प्रमाणपत्रांमुळे खऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण, रोजगार, आरक्षण आणि शासकीय योजनांमधील हक्कांवर गदा येत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
यावर उत्तर देताना आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी धर्मरावबाबा यांच्या मागणीची दखल घेत, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच बोगस अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याला बडतर्फ करण्यात आल्याची माहिती देत, या प्रकरणाशी संबंधित संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात सभागृहासमोर सादर करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या या प्रश्नामुळे बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणातील संपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच चौकशी व कायदेशीर कारवाईला गती मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. आदिवासी समाजाचे आरक्षण आणि घटनात्मक हक्क अबाधित राखण्यासाठी हा मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
































