गडचिरोली : मलेरियामुक्त अभियान गडचिरोली (MMGA) अंतर्गत जिल्हा कार्यदलाची (टास्क फोर्स) सहावी महत्त्वपूर्ण बैठक डॉ.अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. आदिवासीबहुल व दाट जंगलांनी वेढलेल्या गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्याच्या काळात मलेरियाचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेता, ‘त्वरित निदान, तात्काळ उपचार आणि मलेरिया मृत्यू प्रतिबंध’ या त्रिसूत्रीवर भर देत बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

लाहेरी परिसरासाठी साप्ताहिक सर्वेक्षण मोहीम
जिल्ह्यातील एकूण मलेरिया रुग्णांपैकी जवळपास 50 टक्के रुग्ण एकट्या भामरागड तालुक्यातील लाहेरी परिसरात आढळतात. ही गंभीर बाब लक्षात घेऊन या भागासाठी विशेष कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार “प्रत्येक कुटुंब, प्रत्येक दिवस” ही संकल्पना राबवून दररोज सक्रिय सर्वेक्षण (ॲक्टिव्ह सर्व्हेलन्स) केले जाईल. यामध्ये प्रत्येक घराचे आठवड्यातून किमान दोनदा सर्वेक्षण केले जाईल, अशा स्पष्ट सूचना डॉ.अभय बंग यांनी दिल्या. तसेच अचूक निदानासाठी, रक्त तपासणीनंतर आशा स्वयंसेविकेने किमान 15 मिनिटे थांबून त्वरित चाचणीचा निकाल निश्चित करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक ताप म्हणजे मलेरिया असू शकतो- व्यापक जनजागृती
“कोणताही ताप हा मलेरिया असू शकतो; त्यामुळे प्रत्येक तापाची मलेरिया तपासणी करणे आवश्यक आहे” हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक समुदाय जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले. आजाराची नोंदणी मजबूत करण्यासाठी खासगी डॉक्टरांचा सक्रिय सहभाग वाढविण्याची आवश्यकताही डॉ.बंग यांनी अधोरेखित केली.
जैविक नियंत्रण आणि वार्षिक कृती आराखडा
डासांच्या अळ्यांवर नियंत्रणासाठी ‘गुप्पी माशांचा’ प्रभावी वापर वाढवून जैविक कीटक नियंत्रणाला प्राधान्य देण्याची शिफारस करण्यात आली. यासोबतच जिल्ह्यासाठी मलेरिया नियंत्रणाचा सर्वसमावेशक ‘वार्षिक कृती आराखडा’ तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
स्थानिक समुदायाचा सहभाग आणि कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण
मलेरिया निर्मूलन हे केवळ आरोग्य विभागाचे काम नसून संपूर्ण समाजाच्या सहभागातूनच शक्य आहे. त्यामुळे गाव पाटील, बचत गट, अंगणवाडी सेविका, महिला मंडळ तसेच स्थानिक समुदायाचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला. याशिवाय, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी नियमित क्षमतावर्धन (कॅपॅसिटी बिल्डिंग) करून कार्यक्षमता मूल्यमापन व तटस्थ संस्थेद्वारे (थर्ड पार्टी) पुनरावलोकन करून कामाच्या गुणवत्तेचे मूल्यांकन केले जाईल.
नियमित संनियंत्रण व उपाययोजना
प्रत्येक उपकेंद्र स्तरावर वार्षिक परजीवी प्रादुर्भाव दराचे नियमित निरीक्षण, स्थलांतरित लोकांचे संनियंत्रण, उच्च जोखीम क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन कीटकनाशकयुक्त मच्छरदाण्यांचे वाटप, तसेच घरांतर्गत कीटकनाशक फवारणीच्या अंमलबजावणीची गुणवत्ता व लोकसंख्या व्याप्ती यावर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
शासन, आरोग्य यंत्रणा, विकास भागीदार आणि स्थानिक समुदाय यांच्या समन्वित प्रयत्नांतून गडचिरोली जिल्हा मलेरियामुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्चितपणे साध्य होईल, असा विश्वास टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ.अभय बंग व उपस्थित मान्यवरांनी बैठकीच्या शेवटी व्यक्त केला.
बैठकीला उपस्थित मान्यवर
या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. माधव शिंदे, डॉ.अतुल नगिमे, डॉ.अचिंत्य श्रीवास्तव, महेश झरकर, डॉ.अमोल पाटील (गेट्स फाउंडेशन) व डॉ.सुप्रिया लक्ष्मी तोटीगार हे प्रत्यक्ष उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, डॉ.नीरज धिंग्रा, डॉ.प्रकाश ढोके, डॉ.नयना दुफारे (सहसंचालक, आरोग्य सेवा) आणि डॉ.मनीष ढाकते (तालुका आरोग्य अधिकारी, भामरागड) हे दूरदृश्यप्रणालीद्वारे (ऑनलाइन) सहभागी झाले होते.
































