
गडचिरोली : एकीकडे मोठ्या उद्योगांसाठी या जिल्ह्यात सरकारकडून पायघड्या घातल्या जात आहे. गडचिरोलीच्या नावावर लूट करण्याचा प्रकार सुरू आहे. हा जिल्हा ‘सोने की चिडिया’ झाला आहे, पण तो लोकांसाठी नाही तर केवळ सत्ताधाऱ्यांसाठी, अशी टिका शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली. गुरूवारी संध्याकाळी ते गडचिरोलीत माध्यमांशी बोलत होते.
येत्या 18 जुलै रोजी नागपुरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आयोजित रामरक्षा आंदोलनाची माहिती देण्यासाठी आणि पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दानवे संध्याकाळी गडचिरोलीत आले होते.
यावेळी दानवे म्हणाले, मोठमोठ्या कंपन्या येऊन या जिल्ह्यात मनमानी करत आहेत. आदिवासींच्या जमिनी लाटल्या जात आहेत. आदिवासींना कोणत्याच प्रकारचे संरक्षण आणि न्याय मिळत नाही, ही गडचिरोलीची अवस्था आहे. या जिल्ह्यातील विविध प्रश्न जसेच्या तसे कायम आहेत. त्यामुळे येथील प्रश्नांवर आम्ही येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात किंवा त्यापूर्वी आवाज उठवू, मोठा मोर्चा काढू, अशी माहिती यावेळी दानवे यांनी दिली.
रस्ते चांगले नाही, विमानतळ कशासाठी?
गडचिरोलीतील प्रस्तावित विमानतळासाठी शेतजमिनी देण्यास होत असलेल्या विरोधावर शिवसेनेची भूमिका मांडताना अंबादास दानवे म्हणाले, गडचिरोलीत अद्याप चांगले रस्ते नाहीत, मग ते करण्याऐवजी विमानतळ कशासाठी? असा सवाल त्यांनी केला. आज बहुतांश जिल्ह्याच्या ठिकाणचे विमानतळ बंद आहेत. विमानतळाच्या परिसरातील जागा आधी उद्योगपतींनी लाटायच्या आणि नंतर त्या चढ्या दराने सरकारने विकत घ्यायच्या ही कार्यपद्धती राज्यात सुरू असल्याचे ते म्हणाले.
या पत्रपरिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पवन गेडाम व इतर पदाधिकारी उपस्थित होते. पत्रपरिषदेनंतर अंबादास दानवे यांचे शिवसेनेच्या वतीने स्वागत करून सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
































