Home पब्लिक प्रॉब्लेम अहेरी विधानसभा क्षेत्रात मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्त्यांच्या कामांना वेग

अहेरी विधानसभा क्षेत्रात मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्त्यांच्या कामांना वेग

आ.धर्मरावबाबांच्या अध्यक्षतेखाली आढावा

अहेरी : शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत बारमाही, सुरक्षित आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देणाऱ्या मुख्यमंत्री बळीराजा शेत-पांदण रस्ते योजनेच्या 2026-27 या आर्थिक वर्षातील कामांचे नियोजन करण्यासाठी अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी अहेरी तहसील कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीस उपविभागीय अधिकारी प्रशांत पिसाळ यांच्यासह अहेरी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या पाचही तालुक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत 2026-27 या आर्थिक वर्षात कोणत्या गावांमध्ये, कोणत्या क्लस्टरनुसार आणि कोणत्या प्राधान्यक्रमाने पांदण रस्त्यांची कामे हाती घ्यावीत, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक तालुक्यातील गरजांचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळेल, अशा पद्धतीने नियोजन करण्याचे निर्देश आमदार आत्राम यांनी दिले. विशेष म्हणजे, 2025-26 या आर्थिक वर्षात सिरोंचा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पांदण रस्त्यांची कामे मंजूर झाली असून त्यापैकी बहुतांश कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. यापूर्वी मंजूर झालेल्या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन अंमलबजावणी सुरू आहे. अनेक कंत्राटदारांनी सहभाग नोंदविला असला तरी आवश्यक निकष पूर्ण करणाऱ्या पात्र कंत्राटदारांची निवड करण्यात आली असून कामांना गती मिळत आहे.

भामरागड, मुलचेरा, एटापल्ली आणि अहेरी तालुक्यात नवीन रस्त्यांची निवड, क्लस्टरनिहाय नियोजन, अतिक्रमणमुक्त मार्ग आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत बैठकीत सखोल चर्चा झाली. कामे दर्जेदार, वेळेत आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.

मुख्यमंत्री बळीराजा शेत-पांदण रस्ते योजना ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना मानली जाते. या योजनेमुळे शेतापर्यंत बारमाही रस्ता उपलब्ध होतो, कृषी यंत्रसामग्री ने-आण सुलभ होते, शेतीमालाची वाहतूक जलद होते, उत्पादन खर्च कमी होतो आणि ग्रामीण दळणवळणाला चालना मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासोबतच गावांच्या सर्वांगीण विकासालाही गती मिळते, त्यामुळे त्वरित कामे पूर्ण करा, असे निर्देश आ.आत्राम यांनी दिले.