Home क्राईम एटापल्लीनंतर भामरागड तालुक्यातील कथित नक्षली बॅनर-पत्रकांचा पर्दाफाश

एटापल्लीनंतर भामरागड तालुक्यातील कथित नक्षली बॅनर-पत्रकांचा पर्दाफाश

सहा स्थानिक लोकांना पोलिसांकडून अटक

गडचिरोली : चार दिवसांपूर्वी भामरागड तालुक्यातील फुलणार पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत कथित नक्षली बॅनर व पत्रके टाकून दहशत निर्माण करणा­ऱ्या सहा आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अटक केली. नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर माओवादी असल्याचे भासवत त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. मात्र ते बॅनर किंवा पत्रकं नेमके कोणी बनविले, तो कोणाच्या सांगण्यावरून लावण्यात आले हे मात्र स्पष्ट झालेले नाही. त्यासंदर्भात तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

आधी एटापल्ली मग भामरागड तालुक्यात बॅनर

गडचिरोली जिल्ह्रातील माओवाद संपुष्टात येऊन पोलीस दलाच्या अभिलेखावर एकही माओवादी जिल्ह्यात शिल्लक नाही. गडचिरोली पोलीस दलाने “ऑपरेशन अंतिम प्रहार” च्या माध्यमातून विशेष शोधमोहीम राबवून गडचिरोली जिल्ह्रातील माओवाद्यांची दहशत पूर्णपणे संपुष्टात आणली आहे. असे असताना दोन आठवड्यांपूर्वी एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी परिसरात नक्षली आशयाच्या बॅनर व पत्रकातून प्रस्तावित खाणींना विरोध दर्शवण्यात आला होता. ते बॅनर लावल्याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी दि.25 जुलै रोजी अटक केली. मात्र त्याच दिवशी छत्तीसगड सीमेकडील फुलणार पोलीस मद केंद्राच्या हद्दीत माओवादी असल्याचा बनाव करून बॅनर व पत्रके टाकण्यात आली.

तातडीने कारवाई करत केली अटक

याबाबत गडचिरोली पोलीस दलाकडून तात्काळ कारवाई करून दहशत निर्माण करणा­ऱ्या सहा आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली. त्यात जोगा रैनु धुर्वा, (40 वर्ष), रा.मिरगुळवंचा ता.भामरागड, मालू कांडे धुर्वा (42 वर्ष) रा.मिरगुळवंचा ता.भामरागड, दलसु मर्रा तेलामी, (50 वर्ष), रा.कृष्णार ता.भामरागड, चैतु डूंगा धुर्वा, (53 वर्ष) रा.दोबुर ता.भामरागड, गणेश देवू आलामी, (40 वर्ष), रा.पोयारकोठी ता.भामरागड आणि राजेश दल्लु वड्डे, (32 वर्ष), रा.मिरगुळवंचा ता.भामरागड यांचा समावेश आहे.

बेकायदेशिर कृत्यात सहभागी होऊ नका

पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी सदर कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदारांचे कौतुक करत, नागरिकांनी नक्षल सप्ताह व माओवादाच्या नावाखाली कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये. अशा प्रकारच्या कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात नागरिकांनी सहभागी होवू नये, असे आवाहन केले. याप्रकारे कोणीही नागरिकांमध्ये भिती व दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याविरुध्द कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.