
गडचिरोली : महाराष्ट्राच्या समृद्ध कृषी व सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेला तान्हा पोळा गडचिरोली शहरातील रेड्डी गोडाऊन चौकात मोठ्या उत्साहात आणि आनंदमयी वातावरणात साजरा करण्यात आला. ‘हर हर महादेव तान्हा पोळा मंडळा’च्या वतीने आयोजित या तान्हा पोळ्याला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवत उत्कृष्ट सजावटीसाठी मुलांना बक्षिसांचे वाटप केले. (खाली वाचा)

यावेळी डॉ.अशोक नेते यांनी चिमुकल्या बालगोपालांशी संवाद साधत त्यांचा उत्साह वाढविला. मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उत्कृष्ट नंदीबैल सजावट व आकर्षक वेशभूषा स्पर्धेतील विजेत्या बालकांना डॅा.नेते यांच्या हस्ते रोख पारितोषिके व बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
आकर्षक नंदीबैल सजावट आणि बालकांचा उत्साह
तान्हा पोळ्यानिमित्त लहान मुलांनी पारंपरिक पद्धतीने सजवलेले नंदीबैल, रंगीबेरंगी सजावट आणि विविध आकर्षक वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. बालकांच्या उत्साहाने आणि आनंदाने संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमात सहभागी बालगोपालांना खाऊचे वाटप, तसेच शालेय साहित्य किटचे वितरण करण्यात आले. बक्षिसे मिळाल्यानंतर बालकांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला. उपस्थित नागरिकांनी मंडळाच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
आशीर्वाद नगरात डॉ.नेते यांची सदिच्छा भेट
तान्हा पोळ्याच्या निमित्ताने डॉ.अशोक नेते यांनी राधे बिल्डिंगजवळील आशीर्वाद नगर येथील तान्हा पोळा उत्सवालाही प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी नंदीबैल पूजन व तान्हा पोळा उत्सवाला उत्साहाने हजेरी लावली. रेड्डी गोडाऊन चौक व आशीर्वाद नगर येथील नागरिक, आयोजक तसेच बालगोपालांशी संवाद साधत त्यांनी तान्हा पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील विविध भागांत तान्हा पोळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमांना भेट देऊन नागरिकांच्या आनंदात ते सहभागी झाले.
यावेळी नगराध्यक्ष अॅड.प्रणोती सागर निंबोरकर, न.प. सभापती सीमा कन्नमवार, सामाजिक नेते अरुण निंबोरकर, नंदु कुमरे, प्रकाश निकुरे, अविनाश पाल, निलेश बोमनवार, मनीष भुसकुटे, शेखर साळवे, राजू मल्लेलवार, राजू बार, सोनू ब्राह्मणवाडे, विष्णू तसेच आशीर्वाद नगर येथील संजय बारापात्रे, मंगेश रणदिवे, रवि मेश्राम, प्रवीण रक्षमवार यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि मोठ्या संख्येने बालगोपाल उपस्थित होते. परंपरा, संस्कृती आणि बालमनाचा आनंद यांचा सुंदर संगम असलेल्या तान्हा पोळ्यांमुळे गडचिरोली शहरातील वातावरण आनंदमय झाले होते.
































