Home दैनंदिन बातम्या पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवकांची भरती, सोमवारपर्यंत पसंतीक्रम द्या

पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवकांची भरती, सोमवारपर्यंत पसंतीक्रम द्या

सीईओ सुहास गाडे यांचे आवाहन

गडचिरोली : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यात गडचिरोली जिल्ह्यात एकूण 828 पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांनी आपला पसंतीक्रम 11 ऑगस्टपर्यंत पोर्टलवर लॉक करावा, असे आवाहन गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

​शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT-2025) दिनांक 27 मे 2025 ते 5 जून 2025 या कालावधीत घेण्यात आली होती. या चाचणीतील प्राप्त गुणांच्या आधारे इयत्ता पहिली ते बारावीकरिता रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे. शासनाच्या आदेशानुसार संबंधित व्यवस्थापनातील रिक्त पदे आणि आरक्षणाचा विचार करून 80 टक्के पदांसाठी ही भरती प्रक्रिया नियोजित आहे.

गडचिरोली जि.प.मधील पदभरतीचा तपशिल

​गडचिरोली जिल्ह्यासाठी एकूण 828 पदे भरली जाणार असून त्याचा पदनिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे. ​इयत्ता 1 ली ते 5 वी साठी ८१५ पदे, ​इयत्ता 6 वी ते 8 वी साठी 9 पदे, ​इयत्ता 9 वी ते 10 वी करिता 4 पदे (मराठी माध्यम- 2, हिंदी माध्यम- 2)

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना व कार्यवाही

उमेदवारांनी लॉगिन करून प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी tait2025. mahateacher recruitment.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. पदनिहाय पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा दिनांक 6 आॅगस्ट 2026 पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी आपले पसंतीक्रम 11 आॅगस्ट 2026 पर्यंत दिलेल्या मुदतीत लॉक करणे अनिवार्य आहे.

उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर, मुलाखतीशिवाय या प्रकारातील गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. पदभरतीशी संबंधित उमेदवारांचे कोणतेही म्हणणे किंवा मागणी असल्यास त्यांनी edupavitra25 @gmail.com या ई-मेलवर पाठवावे, जेणेकरून प्रशासनाकडून त्याची योग्य ती दखल घेतली जाईल.

​जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी विहित वेळेत पोर्टलवरील कार्यवाही पूर्ण करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.