Home पब्लिक प्रॉब्लेम विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी गोंडवाना विद्यापीठावर आंदोलन

विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी गोंडवाना विद्यापीठावर आंदोलन

'अभाविप'कडून नारेबाजी व निवेदन

गडचिरोली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, गडचिरोली विभागाच्या वतीने गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित शैक्षणिक समस्यांच्या निराकरणासाठी गोंडवाना विद्यापीठावर आंदोलन करून कुलगुरूंना निवेदन सादर करण्यात आले. (अधिक बातमी खाली वाचा)

अ.भा.वि.प.चे विदर्भ प्रांत मंत्री देवाशिष गोतरकर, विदर्भ प्रांत सहमंत्री सुजान चौधरी यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागासमोर निदर्शने केली. त्यानंतर कुलसचिव डॅा.अनिल हिरेखन यांनी मोर्चेकऱ्यांचे म्हणने ऐकून घेतले. मात्र कुलगुरूंनी येऊन निवेदन स्वीकारावे अशी मागणी केल्यानंतर कुलगुरू डॅा.प्रशांत बोकारे यांनी येऊन निवेदन स्वीकारले.

या निवेदनामध्ये परीक्षा निकाल वेळेत जाहीर करणे, रोखून धरलेला निकाल तात्काळ घोषित करणे, निकालावरील चुकीच्या तारखा दुरुस्त करणे, उपस्थित विद्यार्थ्यांना अनुपस्थित दाखविण्याच्या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करणे, उत्तरपत्रिका तपासणीतील त्रुटी दूर करणे, पुनर्मूल्यांकनातील अनियमितता, डिजिटल उत्तरपत्रिकांमधील चुका, “कमवा व शिका” योजनेचे मानधन वेळेवर देणे, विद्यार्थी विकास विभागाच्या कार्यक्रमांची माहिती वेळेत देणे, PET परीक्षा, संशोधकांच्या समस्या तसेच NEP संदर्भातील विविध मागण्या मांडण्यात आल्या.

यावेळी विद्यार्थ्यांच्या समस्या तातडीने न सोडविल्यास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.