गडचिरोली : आदिवासी विकासमंत्री डॉ.अशोक उईके हे गडचिरोलीचा दौरा आटोपून रात्री यवतमाळकडे परत जात असताना शहरालगत एका युवकाचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ताफा थांबवून जखमी युवकाला तातडीने वैद्यकीय मदत मिळवून दिली. त्यांची ही संवेदनशिलता चर्चेचा विषय झाली आहे.
गडचिरोली शहराबाहेर पडल्यानंतर रस्त्यावर एक युवक अपघातग्रस्त झाला असल्याचे मंत्री डॉ.उईके यांच्या लक्षात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ आपल्या ताफ्यातील गाड्या थांबवण्याचे निर्देश दिले. स्वतः गाडीतून खाली उतरून जखमी युवकाची त्यांनी पाहणी केली. वेळेचे महत्त्व ओळखून त्यांनी कुठलीही वाट न पाहता, आपल्या ताफ्यातील एक वाहन तात्काळ त्या जखमी युवकाच्या मदतीसाठी दिले आणि त्याला गडचिरोली येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी रवाना केले.
आरोग्य यंत्रणेला तातडीने उपचाराचे निर्देश
जखमी युवकाला रुग्णालयात पाठवल्यानंतर डॉ.उईके यांनी लगेचच जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आरोग्य यंत्रणेशी आणि संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अपघातातील जखमी युवकावर तात्काळ, योग्य आणि आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार सुरू करण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य प्रशासनाला दिले. मंत्री उईके यांची ही समयसूचकता आणि तत्परतेमुळे अपघातग्रस्त युवकाला वेळेत वैद्यकीय मदत उपलब्ध होणे शक्य झाले.
































