Home दैनंदिन बातम्या ‘विद्यापीठ आपल्या गावात’ उपक्रम, गोंडवानाच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट

‘विद्यापीठ आपल्या गावात’ उपक्रम, गोंडवानाच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट

बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची पाहणी

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाद्वारे संचालित आदर्श पदवी महाविद्यालयातर्फे ‘विद्यापीठ आपल्या गावात’ या उपक्रमांत जांभळी, बिबी व निमणी येथील विद्यार्थ्यांसाठी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली (जि.चंद्रपूर) येथे एकदिवसीय शैक्षणिक क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. या क्षेत्रभेटीत सुमारे 76 विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला.

या क्षेत्रभेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना बांबूच्या विविध जाती, त्यांची वैशिष्ट्ये, लागवड, संवर्धन तसेच बांबूचे विविध उपयोग याबाबत प्रत्यक्ष अनुभवातून माहिती घेणे हा होता. विद्यार्थ्यांनी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील विविध विभागांना भेट देत बांबू रोपवाटिका, बांबू बगीचा आणि विविध प्रजातींचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. यावेळी केंद्रातील मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना बांबूच्या विविध जातींची ओळख, त्यांचे उपयोग आणि लागवडीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

क्षेत्रभेटीदरम्यान बांबूपासून विविध उपयोगी व आकर्षक वस्तू कशा तयार केल्या जातात, याचेही विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. बांबूच्या माध्यमातून रोजगाराच्या विविध संधी निर्माण होऊ शकतात, याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. डिजिटल माध्यमांसह प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांना बांबूविषयी अधिक सखोल व उपयुक्त ज्ञान मिळाले.

या क्षेत्रभेटीस आदर्श पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य (प्र.) डॉ.विवेक जोशी, महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स चंद्रपूरचे प्राचार्य डॉ.शैलेन्द्र देव, ‘विद्यापीठ आपल्या गावात’ उपक्रमाचे समन्वयक डॉ.महेंद्र वर्धलवार आणि लिपिक प्रवीण गिरडकर उपस्थित होते. सहभागी विद्यार्थ्यांसोबत आशिष देरकर, उमेश राजूरकर, श्वेता बावने, मंगेश कळते व इतर शिक्षक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळावे, कौशल्यविकासाला चालना मिळावी आणि स्थानिक संसाधनांमधून रोजगाराच्या संधींची ओळख व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही क्षेत्रभेट विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व ज्ञानवर्धक ठरली.