Home पब्लिक प्रॉब्लेम आश्रमशाळेवर प्रशासक नेमा, पण गावातील शाळा बंद करू नका

आश्रमशाळेवर प्रशासक नेमा, पण गावातील शाळा बंद करू नका

जपतलाईच्या नागरिकांचे निवेदन

गडचिरोली : सर्पदंश आणि विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या घटनेनंतर धानोरा तालुक्यातील जपतलाई गावातील अनुदानित आश्रमशाळेची मान्यता तातडीने कायमस्वरूपी रद्द करण्याचा आदेश आदिवासी विकास विभागाने काढला. पण या आततायीपणामुळे जपतलाईसह परिसरातील 15 ते 20 किलोमीटरवरच्या अनेक गावांमधील विद्यार्थी आणि त्यांचे पालक अडचणीत आले आहेत. त्यांनी गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देऊन आपली व्यथा मांडली. आवश्यकता वाटत असल्यास प्रशासक नेमा, पण शाळा बंद करून मुलांना इतरत्र हलवून नका, अशी विनंती या निवेदनातून केली आहे.

या शाळेमध्ये वर्ग 1 ते 10 वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सर्पदंशाच्या घटनेनंतर सर्व विद्यार्थी आपापल्या गावाकडे निघून गेले आहेत. शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यात दहावीच्या विद्यार्थ्यांचे सर्वाधिक नुकसान होत आहे. या शाळेच्या विद्यार्थ्यांना त्यांना जवळ पडेल अशा शासकीय आश्रमशाळेत समायोजित केले जाणार आहे. मात्र जिल्ह्यातील सर्वच अनुदानित आणि शासकीय आश्रमशाळांची अवस्था वाईट आहे. त्यांच्या तुलनेत जपतलाईची शाळा इमारत तरी बरी आहे, असे पालकांचे म्हणने आहे.

त्यामुळे प्रशासनाने या शाळेवर प्रशासक नेमून शाळेचे संचालन करावे आणि येथील शिक्षकांच्या माध्यमातून शाळा पूर्ववत सुरू करावी अशी विनंती गावकऱ्यांनी केली. तसे न झाल्यास गावकरी आंदोलन करतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

या निवेदनावर काशिराम यशवंत करंगामी, विनोद देवशा करंगामी, अंकुश दिलीप मडावी, यामिना सावन करंगामी, रत्नमाला करंगामी, कांता कुमोठी, लता तुलावी, वंदना हलामी, वनिता कैलास कोल्हे, आंचल बाजीराम गावडे, वसंती केशव हलामी, नुतन गुरूदेव धुर्वे, पिंकी महादेव धुर्वे, नामदेव बुधाजी वट्टी, मैना नामदेव करंगामी, अर्चना प्रफुल्ल करंगामी, सेजल अशोक हलामी, झिम्मा अशोक हलामी, संतोष रावजी गावडे, तुकाराम करंगामी, मनोहर केराम, नामदेव वाबजी करंगामी, मारोती दामसिंग करंगामी आदी अनेकांच्या सह्या आहेत.