Home महिला विश्व गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने महिला दक्षता समितीची बैठक

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने महिला दक्षता समितीची बैठक

महिलांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने चर्चा

गडचिरोली : माओवादासह विविध आव्हानांचा सामना करत असतानाच गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने वेळोवेळी विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यातच जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील महिलांपर्यंत शासनाच्या योजना, कायदेविषयक माहिती आणि आवश्यक सुविधा पोहोचविण्यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. महिला सक्षमीकरण, महिलांची सुरक्षितता तसेच त्यांना शासनाच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक एम.रमेश यांचे मार्गदर्शनाखाली महिला दक्षता समितीची बैठक घेण्यात आली.

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने महिलांच्या संदर्भातील प्रश्नांच्या अनुषंगाने उपाययोजनांकरीता महिला दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखालील सदर समितीमध्ये अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक (गृह) यांच्यासह, पोलीस अधिकारी व अंमलदार, तसेच गडचिरोली शहरातील विविध सामाजिक कार्यकर्त्या, प्रतिष्ठित महिला वकिल, डॉक्टर, शिक्षिका यांचा समावेश आहे.

यावेळी महिलांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी, त्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित विविध बाबी, कायदेशीर हक्क, सामाजिक प्रश्न तसेच शालेय विद्यार्थींनींच्या सुरक्षेसंबंधी उपलब्ध असलेल्या विविध संधींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यासोबतच महिलांना महिला सुरक्षा, छेडछाड व लैंगिक अत्याचार विरोधातील कायदेशीर तरतुदी, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर तसेच आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांशी संपर्क साधण्याच्या पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

ड्रग फ्री कॅम्पस संकल्पनेबाबत चर्चा करण्यात येऊन त्यासंदर्भातल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच याप्रसंगी उपस्थित दक्षता समिती सदस्य महिलांकडून देखील सदर विषयांबाबत सल्ले व सुचना घेण्यात आल्या. महिलांनी पोलीस दलाच्या या उपक्रमाचे स्वागत करून महिला सुरक्षा व सक्षमीकरणासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

पोलीस अधीक्षक एम.रमेश म्हणाले, ‘एखादी घटना घडल्यानंतर त्यावर कायदेशिर कारवाई करण्याऐवजी अशी घटना घडूच नये याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने भर देण्यात येणार आहे. महिलांनी कोणत्याही प्रकारच्या अन्यायाला किंवा अत्याचाराला बळी न पडता आपल्या हक्कांविषयी जागरुक राहणे आवश्यक आहे. महिलांना त्यांच्या समस्या मोकळेपणाने मांडता याव्यात, तसेच अडचणीच्या प्रसंगी पोलीस दलाकडून तात्काळ मदत मिळावी यासाठी पोलीस दल सदैव तत्पर आहे. डायल 112 या आपत्कालीन संपर्क क्रमांकाच्या माध्यमातून महिला व बालकांसह सर्वच नागरिकांना मदत मिळवून देण्यात येत असते. तसेच पोलीस दलासोबतच समाजातील सर्व घटकांनी देखील जागरुक राहुन महिला सुरक्षेसाठी सक्रिय पुढाकार घ्यावा. महिलांचा सन्मान, सुरक्षितता आणि स्वावलंबन यांना प्राधान्य देत गडचिरोली पोलीस दल महिला सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध आहे.’

बैठकीच्या आयोजनासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.अरुण फेगडे व भरोसा सेल येथील पो.उपनिरीक्षक राजश्री रामटेके तथा अंमलदारांनी विशेष परिश्रम घेतले.