आलापल्ली : दक्षिण गडचिरोली भागाचे मुख्य केंद्र असलेला आलापल्ली परिसर सध्या गणेशोत्सवातील कार्यक्रमांमुळे भक्तीमय वातावरणाने न्हाऊन निघाला आहे. गणपतीजवळ भजन सादर करण्यासाठी येथील माऊली महिला भजन मंडळाला मोठी मागणी असल्याने सर्वत्र या भजन मंडळाचे सूर गुंजताना दिसत आहेत.
संगीता बुरांडे यांनी स्थापन केलेले हे महिला भजन मंडळ माऊली भजन मंडळी या नावाने ओळखले जाते. सूर, लय, तालात विठ्ठल, शिवशंकर, राधा-कृष्णावर आधारीत, तसेच संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासह अनेक संतांनी रचलेली भजने, अभंग व गौळण या मंडळाकडून सादर केल्या जातात.
विशेष म्हणजे तबला, पेटी, खंजेरी, बासरी, मंजीरे आदि सर्व वाद्य महिलाच वाजवून एकसुरात भजन गातात. त्यामुळे भजन ऐकणारे भाविक भक्तीत तल्लीन होताना पहायला मिळतात. सार्वजनिक मंडळांसोबत घरगुती गणेशासमोरही भजने सादर करण्यासाठी माऊली महिला भजन मंडळाला पाचारण केले जात आहे.
या महिला भजन मंडळात संगीता बुरांडे, प्रमिला फरकाडे, माया मडावी, सुरेखा डेकाटे, शुभांगी नागपुरवार, रेखा कुंभलवार, माया नैनुरवार, मालती खांडेकर, सुरेखा आत्राम, रजनी फाये, कल्पना कट्टावार, वनिता खरवडे, संगीता सिडाम, रविना बुलेवार, पल्लवी शेट्ये यांच्यासह भजनाची आवड असलेल्या इतरही महिला सहभागी होतात.
































