गडचिरोली : दारुबंदी असताना अवैधरीत्या छुप्या मार्गाने दारूची वाहतूक आणि विक्री करण्याचा प्रयत्न होत असतो. याच प्रयत्नात आरमोरी येथे दारूच्या पेट्यांनी भरलेले एक वाहन सहायक पोलीस अधीक्षक तथा गडचिरोलीचे एसडीपीओ अनिकेत हिरडे व त्यांच्या पथकाने पकडले. या कारवाई 4 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई गोपनिय माहितीच्या आधारे काल, दि.5 ऑक्टोबर रोजी करण्यात आली. आरोपी रूपेश रेखचंद ठवरे (29 वर्षे), रा.आरमोरी, हा एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनामध्ये अवैधरित्या देशी दारू बाळगून इंदिरा नगर, बर्डी आरमोरी येथुन दारूची खेप घेऊन जाणार असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक हिरडे यांना मिळाली होती. त्या माहितीवरून त्यांनी व त्यांच्या पथकाने आरमोरीच्या इंदिरानगर बर्डी ते पाण्याच्या कालव्याकडे जाणाऱ्या सिमेंट रोडवर सापळा रचला. संबंधित वाहनाला थांबून तपासणी केली असता, त्यात रॉकेट देशी दारु संत्रा प्रवरा डिस्टीलरी कंपनीच्या 90 एम.एल. मापाच्या 11 खर्डा पेट्या (1100 नग सिलबंद निपा), टायगर ब्रँड देशी दारु विदर्भ डिस्टीलरी कंपनीच्या 90 एल.एल. मापाच्या 6 खर्डा पेट्या (600 सिलबंद निपा), रॉकेट देशी दारु बडीशेप प्रवरा डिस्टीलरी कंपनीच्या 90 एम.एल. मापाच्या 3 खर्डा पेट्या (300 सिलबंद निपा) अशी 1 लाख 60 हजारांची दारू आणि दारु वाहतुकीकरीता वापरलेली एक जुनी पांढऱ्या रंगाची ह्रुंडाई कंपनीची एक्सेंट चारचाकी वाहन क्र.एमएच 27 बीई 1043 (किंमत 3 लाख रुपये) असा एकूण 4 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर मु्द्देमाल राहुल कैलास टेंभुर्णे (40 वर्षे), रा.इंदिरानगर बर्डी, आरमोरी याचा असून त्यांच्या सांगण्यावरुन ती दारु नेत असल्याचे त्याने सांगितले. अधिक तपास आरमोरी पोलीस करत आहेत.
































