Home पब्लिक प्रॉब्लेम रेगडीगुटा–झुरी रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्याची मागणी

रेगडीगुटा–झुरी रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्याची मागणी

सीपीआयने दिला आंदोलनाचा इशारा

विद्यार्थ्यांकडून समस्या जाणून घेताना भाकपाचे पदाधिकारी

एटापल्ली : रेगडीगुटा ते झुरी गावाकडे जाणाऱ्या माती-मुरूमाच्या रस्त्यावरील नाल्यावर कायमस्वरूपी पूल नसल्याने पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गावकऱ्यांनी गावात बैठक घेऊन भारतीय कॅाम्युनिस्ट पार्टीकडे (CPI) मदतीची मागणी केली. त्यानुसार भाकपाने महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था (MRRDA) आणि संबंधित प्रशासनाकडे निवेदन सादर करत या पुलाची मागणी केली.

नाल्याला पाणी वाढल्यानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होते. शालेय विद्यार्थी, शेतकरी, महिला, वृद्ध नागरिक तसेच रुग्णांना नाला ओलांडताना अडचणी येतात. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत रुग्णालयात नेणेही कठीण होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दुर्गम व आदिवासीबहुल भागातील या मार्गासाठी केवळ माती-मुरूमाचा रस्ता पुरेसा नसून नाल्यावर पाण्याचा प्रवाह आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन मजबूत पूल उभारण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तांत्रिक सर्वेक्षण व अंदाजपत्रक तयार करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

पुलाला प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देऊन प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) किंवा इतर योग्य शासकीय निधीतून काम मंजूर करावे. तोपर्यंत नागरिकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी तात्पुरती व्यवस्था करावी, तसेच कार्यवाहीची लेखी माहिती CPI ला देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

मागणीवर तातडीने कार्यवाही न झाल्यास स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही व संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाकपाच्या वतीने जिल्हा सचिव सचिन मोतकुरवार यांनी दिला आहे.

या निवेदनावर मोतकुरवार यांच्यासह सुरज जक्कुलवार, तसेच रेगडीगुटा येथील गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.